कोरची तालुक्यात निकृष्ट सिमेंट बंधाऱ्याचे काम करणाऱ्या अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
 कोरची तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हुडूकदुमा येथे चार महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे निकृष्ट कामामुळे सिमेंट बंधाऱ्याचे दोन तुकडे झाले. याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये  प्रकाशित झाल्यानंतर  उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्यात आली. यानंतर या प्रकारची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, जलयुक्त शिवार अभियान समिती, कुरखेडा यांना संबंधीत कंत्राटदार व यंत्रणेचे अधिकारी यांच्याविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले.
कोरची तालुक्यातील हुडुकदुम्मा क्र. १ व हुडुकदुम्मा क्र. २ येथील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग, चंद्रपूर यांच्यामार्फत सदर बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. सदर बंधाऱ्याची उपजिल्हाधिकारी  (रोहयो)   विजया जाधव व  पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.ए.मेश्राम यांनी संयुक्त पाहणी केली. पाहणीमध्ये प्रथम दर्शनी सदर बंधाऱ्याचे पायाचे (Foundation) चे काम निकृष्ट असल्याचे दिसून आले, या प्रकारची  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गंभीर दाखल घेतली आहे.  
सदर बंधाऱ्याचे काम प्रथम दर्शनी निकृष्ट दर्जाचे दिसून आले आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर व शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. यास्तव संबंधीत कंत्राटदार व अधिकारी यांचे विरुद्ध  फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असा प्रकार यापुढे होऊ नये याकरीता सक्त स्वरुपाची कारवाई आवश्यक असल्याचे  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-13


Related Photos