येत्या दोन - तीन दिवसात पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- नुकसानग्रस्तांना पुरेपूर मदत मिळणार
-   पत्रकार परिषदेतून दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. भामरागडमध्ये सर्वाधिक पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आरमोरी, देसाईगंज, सिरोंचा तालुक्यातही घरे, शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पथके कार्यरत आहेत. भामरागड मधील परिस्थिती गंभीर असल्यामुळे पंचनामा करण्याचे काम सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात पंचनामे पुर्ण करून नुकसानग्रस्तांना पुरेपूर मदत केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीच्या अंदाजाने ६ आणि ७  सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. यामुळे भामरागडमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली होती. १९९४ साली आलेल्या पुरापेक्षा यावर्षीचा पूर कमीच होता. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महसूल आणि पोलिस प्रशासनाने आपआपल्या चमु साहित्यासह सज्ज ठेवल्या होत्या. 
भामरागड तालुक्यात तसेच इतर ठिकाणी काही घरे क्षतीग्रस्त झाली. काही पूर्णतः कोसळली आहे. क्षतीग्रस्त घरांच्या दुरूस्तीसाठी ६ हजार रूपये तातडीची मदत दिली जाणार आहे. तर संपूर्ण घरे पडलेल्या नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयास ४ लाखांची मदत दिली जाणार आहे. 
पंचनामा करण्यासाठी १४ ते १५ तलाठी तसेच इतर महसूल विभागाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांचे  पथक नेमण्यात आले आहे. पुरपरिस्थितीमुळे रोगराई पसरू नये यासाठी १५ ते २० वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची चमु नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहे. जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारीसुध्दा कार्यरत आहे. यामध्ये ५ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या वतीने नागरीकांना शुध्द पाणी मिळावे याकरीता ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात आहे. तरीही नागरीकांनी मुख्यतः पाणी उकळूनच प्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

देणगी स्वरूपातील मदत केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाच करावी

पूर ओसरल्यानंतर शासनातर्फे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जिवनावश्यक साहित्य पुरविले जात आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीनेसुध्दा साहित्य वितरीत करण्यात आले. काही लोकांकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र देणगी दात्यांनी केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्येच रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे. 
जास्तीत जास्त साहित्य स्वरूपात नागरीकांनी मदत करावी याकरीता १५ ते २० साहित्यांची यादी तयार करण्यात आली आहे. साहित्य जमा करण्यासाठी ३ केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, आलापल्ली आणि भामरागड येथील एका केंद्राचा समावेश आहे, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-13


Related Photos