महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आदिवासी समाजातील लग्नसमारंभामध्ये  मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि काही अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत सामुहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्याकरीता कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंचा नवदाम्पत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेंतर्गत नवदाम्पत्यांना १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी नवदाम्पत्यांपैकी एक व्यक्ती अर्थात वर किंवा वधु अनुसुचित जमातीची असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे वय विवाहाच्या दिनांकास विवाह नोंदणीच्या नियमानुसार असणे आवश्यक आहे. सोबतच वर वधुचा हा विवाह प्रथमच असणे आवश्यक आहे.  

सदर योजना स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. सेवाभावी आयोजन करण्यासाठी संस्थेला १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याकरीता कमीत कमी १० जोडप्यांचा समावेश असावा. ज्या नामांकित संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८५० अंतर्गत नोंदणीकृत आहे. त्यानांच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाहबध्द होणाऱ्या सर्व नवदाम्पत्यांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल. या योजनेची जिल्ह्यामध्ये  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा, असे आदिवासी विकास विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos