गणेश विसर्जन मिरवणूकीच्या बंदोबस्तासाठी पोलिस विभाग सज्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
आज ११ आणि उद्या १२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. यामुळे शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. मिरवणूकीदरम्यान कोणालाही त्रास होउ नये म्हणून पोलिस विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. मिरवणूकीच्या बंदोबस्ताकरीता पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वात अत्याधुनिक सहाय्याने पोलिस दल सज्ज करण्यात आले आहे.
शहरातील सिसीटीव्ही कॅमेरे आणि हॅन्डीकॅमद्वारे संपूर्ण मिरवणूकीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे. संपूर्ण बंदोबस्ताकरीता १ अपर पोलिस अधीक्षक, ५ पोलिस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ५० सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ५५४ पुरूष पोलिस कर्मचारी, ११५ महिला पोलिस कर्मचारी, ९२ पुरूष होमगार्ड, ४० महिला होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, नक्षलविरोधी अभियान पथक, अति जलद प्रतिसाद पथक, १ एसआरपीएफ प्लाटून नेमण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर पोलिसांनी वाॅच टाॅवर व पोलिस मदत केंद्र उभारले आहेत. बॅनर्स व पोस्टर्सद्वारे नागरीकांना महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सोबतच पोलिस मित्रांसह विविध एनजीओचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. नागरीकांनी सोशल मिडीयावर पसरविल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा पोलिस नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, मिरवणूकीदरम्यान ध्वनी प्रदुषण नियमांचे तंतोतंत पालन करून शांततेत व भक्तीमय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-11


Related Photos