पंचनामा करण्यासाठी १९२ अधिकारी - कर्मचाऱ्यांची चमू भामरागडला दाखल


- पूरपिडीतांचे पंचनामे करुन तातडीने मदत देणार : तहसीलदार कैलास अंडील 
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  भामरागड 
: तालुक्यात ०५ सप्टेंबरपासून सतत आलेल्या महापूरामुळे भामरागड व तालुक्यातील अनेक गावे महापूराच्या तडाक्यात सापडले. अनेकांची घरे उद्धस्त झाले. शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. अनेकांची पिके वाहून गेले. अशा पूरपिडीतांचे पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु झाली असून येत्या दोन ते तीन दिवसांत तातडीने शासनाकडून मदत दिली जाईल अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन तहसीलदार कैलास अंडील यांनी दिली. यावेळी भामरागडचे उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके उपस्थित होते.
 तालुक्यातील पूरग्रस्त गावांत जावून प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी -१०, पशुवैद्यकिय अधिकारी -०६, तलाठी -२ ७, मलेरिया वर्कर-५०, कनिष्ठ अभियंता-०६,एटापल्लीतील कोतवाल -५०,भामरागडचे कोतवाल-४३ अशा एकुण १९२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम भामरागडला दाखल झाली असून पूरपिडीतांचे पंचनामे करणे सुरू झाले आहे. हे सर्व अधिकारी-कर्मचारी त्यांच्या पदानुसार पंचनामे करणार आहेत. जसे पूरात वाहून गेलेल्या व मेलेल्या जनावरांची चौकशी पशुवैद्यकिय अधिकारी करतील. दोन दिवसात संपूर्ण पंचनामे करून पूरपिडीतांना आर्थिक मदत देणार असल्याचे तसेच तालुक्यातील कोणीही पूरपिडीत व्यक्ती शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये त्यासाठी पूरग्रस्तांनी पंचनामे करुन घेण्याचे आवाहन तहसीलदार अंडील यांनी केले.
  महापूरात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना पिक विमा मिळवून देणार असल्याचे संवर्ग विकास अधिकारी महेश ढोके यांनी सांगितले. तालुक्यातील पोलीस मदत केंद्रामार्फत पूरपिडीतांचे पंचनामे करुन महसूल विभागाला अहवाल पाठविण्यात येणार असल्याची ग्वाही उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos