महत्वाच्या बातम्या

 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत तब्बल १२८ कोटींची वाढ


- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न

- जिल्ह्याचा अंतीम नियतव्यय ३१३ कोटी

- सन २०२४-२५ चा अंतीम आराखडा मंजूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना राबविली जाते. या योजनेतून विभागांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जिल्ह्याला १८५ कोटी रुपयांची आर्थिक मर्यादी दिली होती. प्रत्यक्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत तब्बल १२८ कोटी रुपयांची वाढ करून घेतली. आता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा पुढील वर्षाचा जिल्ह्याचा नियतव्यय ३१३ कोटी इतका झाला आहे. 

सन २०२४-२५ या वर्षासाठी शासनाने जिल्ह्यांना आर्थिक मर्यादा कळविल्या होत्या. त्या मर्यादेप्रमाणे जिल्ह्यांना विभागांकडून मागणी घेऊन जिल्ह्याचा आराखडा तयार करावयाचा होता. वर्धा जिल्ह्यासाठी शासनाने १८५ कोटी रुपयांची मर्यादा देऊन त्या मर्यादेत आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले होते. या मर्यादेत आराखडा केल्यानंतर अतिरिक्त निधी मिळावा यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार तब्बल १२८ कोटी रुपयांचा वाढीव नियतव्यय जिल्ह्याला मंजूर झाला आहे.

जिल्ह्याला अतिरिक्त निधीची आवश्यकता होती, परंतू शासनाने मर्यादा दिल्याने निधी उपलब्ध होऊ शकत नव्हता. राज्यस्तरीय बैठकीत निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यात विकासाठी कामे मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. मंजूर नियतव्ययामध्ये कृषि व संलग्न सेवांसाठी ३३ कोटी ७४ लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामविकासासाठी ३६ कोटी ५६ लाख, सामाजिक व सामुहिक सेवा १०४ कोटी, पाटबंधारे व पुरनियंत्रण २२ कोटी ५० लाख, ऊर्जा १३ कोटी रुपयांचा समावेश आहे.

उद्योग व वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परिवहन क्षेत्र ३२ कोटी, सामान्य सेवा २९ कोटी ९६ लाख, सामान्य आर्थिक सेवा २६ कोटी ६१ लाख, नाविन्यपुर्ण योजना १० कोटी रुपयांसह ईतर जिल्हा योजनांच्या निधीचा यात समावेश आहे.

विकासकामांना गती येईल - सुधीर मुनगंटीवार

वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात विकासाच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत ब्रेक लागता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे मर्यादेपेक्षा अधिकची म्हणजे तब्बल १२८ कोटीची रक्कम आपण मंजूर करून आणली आहे. या अतिरिक्त निधीमुळे जिल्ह्याची प्राधान्याची कामे तातडीने करता येईल. विभागांनी सदर निधीचा विनियोग उत्तम पध्दतीने आणि गुणवत्तापुर्वक करावा, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या आहे.





  Print






News - Wardha




Related Photos