गुराख्यास वनपालाची मारहाण, नागरीकांची कारवाईची मागणी


- कोनसरी वनपरीक्षेत्रातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
नेहमीप्रमाणे लंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला वनविकास महामंडळाच्या वनपालांनी जबर मारहाण केल्याने गुराखी गंभीर जखमी झाला असून वनपालावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
गंगाराम फकीरा जक्कुलवार असे जखमी गुराख्याचे नाव आहे. गुराखी गंगाराम जक्कुलवार हा नेहमीप्रमाणे आज ११ सप्टेंबर रोजी येनापूर येथील गुरे चारण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेला होता. यावेळी कोणतीही पूर्वसुचना न देता वनविकास महामंडळ कोनसरीचे वनपाल एम.एन. गंधलवार यांनी गुराख्यास मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनपाल गंधलवार यांनी लाठी - काठीने मारहाण केल्यामुळे गुराखी गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बेशुध्द अवस्थेत त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वास बोमकंटीवार, तंटामुक्त समिती येनापूरचे अध्यक्ष दीपक पुच्छलवार, उपसरपंच किरण दुधे, वसंत दंडीकवार व इतर नागरीकांनी त्याला उपचारार्थ दाखल करून आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
वनपालांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी  विश्वास बोमकंटीवार, दीपक पुच्छलवार, माजी पं.स. उपसभापती मनमोहन बंडावार, माजी सरपंच निलकंठ निखाडे, तलांडे, उपसरपंच किरण दुधे, वसंत दंडीकवार, सुरेश जक्कुलवार, रमेश जक्कुलवार, ताराबाई गंगाराम जक्कुलवार यांनी केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos