दोन आत्मसमर्पीत नक्षल्यांवर नक्षल्यांचा गोळीबार, एक ठार तर एक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून गडचिरोली येथे वास्तव्यास असलेल्या आत्मसमर्पीतांवर एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा गावानजीक नक्षल्यांनी गोळीबार केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. सदर घटना काल १० सप्टेेंबर रोजी घडली आहे.
किशोर उर्फ मधुकर पेका मट्टामी (३२) रा. नैनवाडी ता. एटापल्ली असे मृतकाचे नाव आहे तर अशोक उर्फ नांगसु मासा होळी रा. झारेवाडा ता. एटापल्ली (३०) हा जखमी झाला आहे.
आत्मसमर्पीत नक्षली अशोक उर्फ नांगसु मासा होळी हा भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याने २०१० मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तर किशोर उर्फ मधुकर पेका मट्टामी हा कंपनी क्रमांक ४ आणि कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत होता. त्याने २०१३ मध्ये आत्मसमर्पण केले होते. ते दोघेही अधून - मधून नातेवाईकांना भेटण्यासाठी गावी जात होते.
सोमवार ९ सप्टेंबर रोजी दोघेही स्वगावी गेले होते. काल १० सप्टेंबर रोजी किशोर हा अशोक याच्या घरी झारेवाडा येथे आला होता. दोघेही दुचाकीने झारेवाडा येथून गडचिरोलीकडे येण्यास निघाले. यावेळी गिलनगुडा गावाजवळ नक्षल्यांनी दोघांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये अशोक होळी आ जखमी झाला. मात्र त्याने नक्षल्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली व गट्टा पोलिस मदत केंद्र गाठले. यावेळी पोलिस दलाने त्याला तातडीने हेलिकाॅप्टरने गडचिरोली येथे आणले. सध्या त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मधुकर मट्टामी हा नक्षल्यांच्या तावडीत सापडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सन्मानाने जगत असलेल्या आत्मसमर्पीतांवर नक्षल्यांनी गोळीबार केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos