गांधीनगर येथील नागरिकांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार


- जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तालुक्यातील सावंगी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथील नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन तशा आशयाचे निवेदन   जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पाठवले असल्याने राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. 
  प्राप्त माहितीनुसार  गांधीनगर  हे गाव पूरग्रस्त पुनर्वसीत असुन ग्रामपंचायत सावंगी मध्ये समाविष्ट आहे. आजतागायत वरिष्ठ पदाधिका-यांच्या दुर्लक्षितपणामुळे या गावाचा विकास झालेला नाही. त्यामुळे  गांधीनगर स्वतंत्र ग्राम पंचायतीची मागणी मागील बारा वर्षापासून धुळखात पडुन आहे. 
 गांधीनगर येथील लोकसंख्या १७४० असुन सन १९९२ पासुनच्या राजपञानुसार गांधीनगर हे महसूली गाव आहे. स्वतंत्र ग्राम पंचायतीच्या मागणी करीता ग्रामसभा, पंचायत समिती सभा, जिल्हा परिषद स्थायी समिती सभा, या सर्वांची मंजुरी प्राप्त असुन सदर ग्राम पंचायत विभाजनाचा प्रस्ताव आयुक्त नागपुर यांचे शिफारशी नुसार ग्राम विकास मंञालयाचे सचिव यांचेकडे सुद्धा पाठविण्यात आला आहे. 
  दरम्यान मागील १२ वर्षापासूनची गावक-यांची मागणी रास्त असुनही आणि प्रस्तावातिल अटी व शर्थिचे पुर्णपणे पुर्तता करुनही अजून पर्यंत स्वतंत्र ग्राम पंचायतीचे विभाजन करण्यात आलेले नाही.  त्यामुळे स्वतंत्र ग्राम पंचायत होईपर्यंत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गांधीनगर येथील नागरिकांनी सर्वानुमते घेतला असुन तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पाठवले आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे गांधीनगर वासियांचे लक्ष लागुन आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos