कोल्हापूर, सांगलीसारखा महापूर भामरागडमध्येही आला पण...


- स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग ठरले कार्यतत्पर
- ना सरकार पोहचले ना एनडीआरएफ, ना महाराष्ट्राची मदत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
मागील महिन्यात राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये महापूर आला. याची चर्चा देशभर झाली. देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. एनडीआरएफ पोहचले, लाखो लोकांचे प्राण वाचविण्यात आले. सेलिब्रीटींनी लाखोंची मदत केली. अनेक मंत्री पोहचले, सेल्फी काढण्याचे , मदत पोहचविण्याचे राजकारण झाले, विविध संस्था, संघटना सरसावल्या. या ठिकाणी मदत पोहचविण्यात गडचिरोली जिल्हा सुध्दा मागे राहिला नाही. मात्र असाच महापूर भामरागडमध्येही आला पण, ना चर्चा झाली, ना सरकार आले ना एनडीआरएफ. भामरागडमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागच कार्यतत्पर ठरल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी भामरागडला तब्बल सहा वेळा पुराने वेढले. संपूर्ण आदिवासी आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असा भामरागड तालुका. जंगलाने आणि सभोवताली नद्यांनी वेढलेला आहे. ना पक्की घरे आहेत, ना उंच इमारती आहेत. कुडाच्या, मातीच्या घरांमध्ये राहणारे लोक या महापूरात अडकले. यांनाही कोल्हापूर, सांगली प्रमाणेच मदतीची गरज होती. यांच्यासाठीही मदत रॅली निघणे, प्रार्थना करणे गरजेचे होते. मात्र असे कुठेही झाल्याचे दिसून येत नाही. स्थानिक महसूल प्रशासनाने पुरामुळे नागरीकांची व्यवस्था केली. पुरात अडकलेल्यांना स्थानिक पोलिसांनीच बाहेर काढण्याचे काम केले. यामुळे स्थानिक प्रशासन आणि स्थानिक पोलिसच भामरागडसाठी देवदूत आहेत. तब्बल ६० टक्के भामरागड पुरात सापडले. यामुळे भामरागडची अवस्था अस्ताव्यस्त झालेली आहे. दुकाने उध्वस्त झाली. घरे उध्वस्त झाली. शेती नष्ट झाली. भामरागडला पुन्हा सावरण्यासाठी मोठा काळ जाणार आहे. सरकारने भामरागडला अद्यापही पुरग्रस्त जाहिर केलेले नाही. अद्यापही शासनाची ठोस अशी मदत पोहचलेली नाही. स्थानिक प्रशासन नागरीकांच्या मदतीने सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र या ठिकाणी पहावयास मिळत आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-10


Related Photos