गोसे प्रलंबित पुनर्वसनासाठी ५१४ कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर- पालकमंत्री डॉ. परिणय फुके


- दोन महिन्यात निधी मिळणार,  तीन उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
गोसेखुर्द प्रकल्पातील प्रलंबित पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून प्रलंबित पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी 514 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. या विषयात मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत असून हा प्रश्न दोन महिन्यात सोडविला जाणार आहे. 514 कोटीचा निधी दोन महिन्याच्या आत प्राप्त होणार असून प्रलंबित पुनर्वसनाची समस्या निकाली निघेल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत गोसी (बु. 11 लहान उपसिंचन योजना ), पवनी व शेळी उपसा सिंचन योजनांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 
खासदार सुनिल मेंढे, आमदार रामचंद्र अवसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे जे.एम. शेख, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता जगत टाले, कार्यकारी अभियंता प्रविण झोड,पवनीच्या नगराध्यक्षा पुनम काटखाये व अधिकारी उपस्थित होते. तीनही उपसा सिंचन योजनांच्या कामाचे भूमिपूजन उजवा कालवा मौजा बेलगाटा या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पाऊस कमी होताच या कामास सुरुवात करण्यात येईल. काम दोन वर्षात पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
या योजनांमुळे या परिसरातील 33 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे पाणी परंपरागत पध्दतीने न सोडता पाईपच्या माध्यमातून पोहचविण्यात येणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पास 18 हजार 425 कोटीची सुधारित प्रमा शासनाने दिली असून 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. उपसा सिंचन योजनेच्या कामास गती देण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
वन लगत असलेल्या शेतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सोलर कुंपण योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवेगाव-नागझिरा विकासासाठी 300 कोटीचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, पवनी कऱ्हांडला अभयारण्याचा विकास करण्यात येत आहे. याद्वारे मोठया प्रमाणात रोजगार प्राप्त होईल.
गोसी(बु.) उपसा सिंचन योजनेसाठी 187.59 कोटी रकमेची तरतूद असून या उपसा सिंचन योजनेंतर्गत एप्रिल 2021 पर्यंत 22.23 कोटी खर्च झालेला आहे. उपरोक्त सुधारित गोसी उपसा सिंचन योजनेंतर्गत मुख्य व शाखा कालवा तसेच 11 लहान उपसा सिंचन योजना व बंद नलिकेद्वारे वितरणाची संपूर्ण कामे जून 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शेळी उपसा सिंचन योजनेत 15 व पवनी उपसा सिंचन योजनेत 18 गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे.
गोसीखुर्द प्रकल्पास 1983 साली सुरुवात झाली. 2.5 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. मात्र प्रकल्पास गती 2009 ला मिळाली. 2014 पर्यंत 39 हजार हेक्टर पर्यंत सिंचन निर्माण झाले. 2014  ते 2019 या काळात प्रकल्पाने प्रचंड गती पकडली असून गोसे मधून आज रोजी 1 लाख 3 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात शासनाला यश प्राप्त झाले आहे, असे खासदार सुनिल मेंढे यांनी सांगितले. आज भूमिपूजन झालेल्या तीन योजनांमधून 13 हजार 500 हेक्टरला सिंचनाची सोय निर्माण होणार आहे, असेही ते म्हणाले.
मागील 30 वर्षापासून या उपसा सिंचन योजनेची प्रतिक्षा होती. आज तीला गती मिळाली असून 2021 पर्यंत सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असा विश्वास आमदार अवसरे यांनी व्यक्त केला. या परिसरात असलेले काही तलाव  पाण्याने भरलेले असून या तलावात मासेमारीसाठी परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. त्याच प्रमाणे काही तलाव कोरडे असून या तलावात सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता जगत टाले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कार्यकारी अभियंता प्रविण झोड यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-09


Related Photos