रुग्णवाहिकेच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार


-  चालक,  वैद्यकीय अधिकारी  गंभीर जखमी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
 ब्रम्हपुरी मार्गावरील  वैनगंगा नदी जवळ समोरून येणाऱ्या  मोटारसायकलस्वारास रुग्णवाहिका चालकाने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार  जागीच ठार झाल्याची घटना काल ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.  किशोर मारोती कवासे रा.हनुमान वार्ड देसाईगंज  असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेत रुग्णवाहिका  चालक महेश बुद्धधु सिंग, कढोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी डाॅ. भुवनेश्वर घनश्याम खुणे व  कुरखेडा पंचायत समिती मधील  अभियंता नेताजी सदाशिव खुणे हे जखमी झाले आहेत. 
 सदर घटनेतील रुग्णवाहिका चालक महेश बुद्धधु सिंग रा. मुरखळा यास अटक करण्यात आली आहे.  प्राप्त माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.भुवनेश्वर  खुणे हे चालक महेश बुद्धधु सिंग व कुरखेडा पंचायत समितीचे अभियंता नेताजी खुणे यांच्या सोबत  कुरखेडा तालुक्यातील किशोरी येथून  आल्यानंतर देसाईगंज येथील एका लाॅन मध्ये जेवण आटपून कढोली प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका क्रमांक एमएच ३१ , सिक्यू ६४६३ ने   ब्रम्हपुरीकडे जायला निघाले होते. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी चर्चा आहे.  दरम्यान ब्रम्हपुरी येथून आपले इलेक्ट्रिकचे काम आटपून किशोर कवासे राञी साडे दहा वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे  दुचाकी क्रमांक एमएच ३४ एन ५४६१ ने  देसाईगंज कडे  परत येत होते.  वैनगंगा नदिपासुन अर्ध्या किलोमीटर  अंतरावर दुचाकीस्वारास रुग्णवाहिकेची जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार  जागीच ठार झाला. धडक इतकी जबर होती की रुग्णवाहिका उलटून रस्त्याच्या खाली फेकल्या गेली.  यातील तिघांपैकी चालकाला गंभीर दुखापत झाली असुन  डाॅ. खुणे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.  तर त्यांच्या सोबत असलेले  अभियंता  नेताजी खुणे हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.  दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठुन प्रेताचा पंचनामा करुन रुग्णवाहिका चालक महेश बुद्धधु सिंग, डाॅ.खुणे व अभियंता खुणे  यांना ताब्यात घेऊन देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले .  पुढिल तपास देसाईगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रदिप लांडे यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार  अलोणे करीत आहेत. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-09


Related Photos