भामरागड पोलिसांनी वाचविले पुरात अडकलेल्या नागरीकांचे प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात पुरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही भामरागडमध्ये पुरस्थिती आहे. यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासन धावपळ करीत आहे. ७ सप्टेंबर रोजी एक शेतकरी परीवार पुरामुळे अडकल्याने पोलिसांनी मोहिम राबवून सुखरूप बाहेर काढले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक झोल, पोलिस उपनिरीक्षक सुसतकर, सिआरपीएफचे पोलिस निरीक्षक विश्राम सिंग, एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक कातडे यांनी चमु तयार करून बचाव कार्यासाठी भामरागड शहरात धाव घेतली. 
भामरागड पासून ४ किमी अंतरावर पर्लकोटा नदीच्या किनारी परेश पुलान बिश्वास (६५) यांचे शेत पाण्याखाली गेले होते. शेतामध्ये असलेल्या झोपडीमध्ये परेश बिश्वास, पत्नी  आणि दोन मुली अडकल्या होत्या. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक झोल, पोलिस उपनिरीक्षक सुसतकर, पोलिस उपनिरीक्षक होनमाने, पोलिस उपनिरीक्षक कर्णेवाड, सहाय्यक फौजदार खोब्रागडे, नापोशि गजानन राठोड, पोलिस शिपाई बोरकुटे, अरविंद मेश्राम, शरद गुरनुले, राजु गेडमेवाड यांनी बोटब घेवून तात्काळ बचावकार्य सुरू केले. चहुबाजूंनी पाण्याने वेढले होते. यामुळे पोलिसांनी कोणतीही पर्वा न करता नदीच्या प्रवाहात बोट टाकून परेश बिश्वास यांचे शेत गाठले. यावेळी संपूर्ण झोपडी पाण्याखाली गेल्याने ते एका झाडावर बसून होते. त्यांच्यासोबत दोन पाळीव कुत्रेसुध्दा होते. पोलिसांनी परेश बिश्वास, पत्नी सुकली बिश्वास, मुली सुनिता व निकीता तसेच पाळीव कुत्र्यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढले. तसेच आरेवाडा येथील शेतात अडकलेले पांडू दस्सा वेलादी, परसी वेलादी, बंडु गावडे, चिक्कु गावडे यांनासुध्दा पोलिसांनी वाचविले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-09


Related Photos