मुल उपजिल्हा रूग्णालयातील रूग्ण अर्धपोटी


- पोटभर अन्न मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
उत्कृष्ठ रूग्णसेवा दिल्याबदल येथील उपजिल्हा रूग्णालयास पुरस्कार प्राप्त झाला. मात्र,या पुरस्कार प्राप्त रुग्णालयात जेवणात कंजुषी केली जात  असल्याचा प्रकार समोर आला आहे. रूग्णालयात रूग्णांना कमी जेवण मिळत आहे .रूग्णालयातील जेवणामुळे आमचे पोटच भरत नसल्याच्या तक्रारी रूग्णांनी  केल्या आहे. कमी मिळणा-या जेवणाविषयी नातेवाइकांनीही आश्चर्य व्यक्त केले  आहे.  दरम्यान,नियमानुसार रूग्णांना जेवण दिले जात असल्याचे रूग्णालय  व्यवस्थापन आणि कंत्राटदाराने स्पष्ट केले आहे.
मूल आणि तालुक्याची गरज लक्षात घेऊन येथील ग्रामीण रूग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले.तीस खाटांऐवजी वाढीव पन्नास खांटाची उभारणी करण्यात आली. पुन्हा वाढीव पन्नास खाटांची मागणी करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव शासनाकडेधूळखात पडला आहे. उपजिल्हा रूग्णालयात सध्या  दररोज पन्नास ते साठ रूग्ण भरती असतात. वातावरणातील बदलामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तापाची साथ,आणि इतर आजारांची रूग्ण मोठ्या प्रमाणावर भरती आहेत. शासकिय नियमानुसार भरती असलेल्या रूग्णाला मोफत जेवण मिळते.त्यांच्या सोबतच्या असलेल्या नातेवाईकाला घरून जेवणाचा  डब्बा बोलवावा लागतो. असे असले तरी उपजिल्हा रूग्णालयात रूग्णाला मिळणारे जेवण अतिशय अल्प असल्याची तक्रार रूग्णांची आहे.या जेवणामुळे आमचे पोट भरत नाही,असे रूग्णांचे म्हणणे आहे. दोन लहान पेाळया,थोडासा भात,थोडेसे दाळीचे वरण आणि भाजी दिल्या जात असल्याचे रूग्ण सांगतात. सकाळी  नाश्त्यासाठी चमचभर उसळ दिली जाते. जेवणाचा दर्जाही फारसा चांगला नसल्याचे रूग्ण सांगतात. एखादी पोळी जास्तीची मागितली तरी ती दिल्या जात  नाही. रूग्णांच्या नातेवाईकांनीही अशा दिल्या जाणा-या जेवणाविषयी आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा जेवणामुळे रूग्ण बरा होण्यापेक्षा कमजोरच जास्त  होईल, असे नातेवाईक म्हणतात. याला कोणते पोषक आहार म्हणायचे,असा सवाल नातेवाईक करीत आहे. रूग्णांसोबतच्या नातेवाईकाला घरून जेवणाचा डबा बोलवावा लागत असल्याचे नातेवाईक सांगतात. जास्त नको पण पोट भरेल,असे चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे,अशी रूणांची मागणी आहे. 

उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदांचे ग्रहण

 वाढीव पन्नास खाटांच्या मूल उपजिल्हा रूग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. सध्या येथे एक वैद्यकिय अधीक्षक आणि एक वैद्यकिय अधिकारी,आयुषचे दोन आणि इतर तीन असे डाॅक्टर कार्यरत आहेत. या ठिकाणी डाॅक्टरांची सहा पदे रिक्त आहेत. जिल्हयात डाॅक्टरांची बारा पदे भरण्यात आली. मात्र, मूल मध्ये येण्यास कुणीच तयार नाही. आजही येथे स्त्री रोग  तज्ञ,बालरोग तज्ञ आणि सर्जनची आवश्यकता आहे. तज्ञ नसल्यामुळे रूग्णास  रेफर टु चंद्रपूर केल्या जाते.सोनोग्राफी मशीन आहे. परंतु डाॅक्टर प्रभारी असल्यामुळे दोन दोन आठवडे रूग्णांना ताटकळत राहावे लागत असल्याची परीस्थती आहे.

रूग्णांना दिल्या जाणा-या जेवणाविषयी प्रमाण ठरले आहे. शासकीय नियमानुसारच जेवण दिले जाते. जास्त जेवणापेक्षा त्यातील पोषक घटक 
प्रथिने महत्वाची असतात. तरीसुध्दा कंत्राटदारास समज देऊन योग्य आणि  प्रमाणात जेवण मिळण्याविषयी प्रयत्न करतो. 
- डाॅ. बाबर, 
वैद्यकिय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-09


Related Photos