चंद्रावर १ लाख ८१ हजार ४३६ किलो मानवनिर्मित कचरा !


- नासा च्या  अहवालातून माहिती उघड
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
  चंद्रावर जीवसृष्टी आहे काय किंवा चंद्रावर वसाहती स्थापणे शक्य आहे काय याचा अभ्यास करण्यासाठी  अनेक देशांनी चांद्रमोहिमा राबवल्या आहेत.  मात्र नासाने २०१८ मध्ये केलेल्या एका  संशोधनातून चंद्रावर कित्येक टन मानवनिर्मित कचरा निर्माण झाल्याचे उघड झाले आहे.  नासा च्या अहवालानुसार चंद्रावर ४००,०००  पाउंड म्हणजेच  सुमारे १,८१ ,४३६  किलो  मानवनिर्मित कचरा साचला आहे. आता कचऱ्याचे हे प्रमाण वाढल्याची शक्यता आहे.
चांद्रमोहिमेवर गेलेल्या यानातील काही उपकरणे तेथेच सोडल्यास तिथे गेलेले अंतराळवीर आणि यान परतणे सोपे होते आणि खर्चही कमी होतो. तसेच मानवरहित मोहिमेतूम मोठ्या प्रमाणात चंद्रावर कचरा जमा झाला आहे. तसेच चंद्रावर मोहिमेवर पाठवलेले यान आणि उपकरणे दुर्घनाग्रस्त होणे किंवा भरकटणे यामुळेही चंद्रावर कचरा वाढला आहे. अशा यानांचे आणि उपकरणांचे अवशेष चंद्रावरच राहतात. मात्र, चंद्रावर कचरा साचण्याबरोबच आता शुक्र, मंगळ आणि अंतराळातही मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित कचरा निर्माण होणे ही मोठी समस्या असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत संघाने अंतराळात 'स्पूतनिक' नावाचा पहिला कृत्रिम उपग्रह सोडला होता. त्यानंतर अनेक उपग्रह अंतराळात आणि पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. त्यामुळे चंद्र, शुक्र आणि मंगळावर कचरा वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
 अंतराळात आणि पृथ्वीभोवती निकामी उपग्रहांचे अनेक अवशेष भरकटत आहेत. निकामी झालेले कंट्रोल स्टेशन, रॉकेटचे अपशेष, मृत उपग्रह, भरकटलेले अंतराळ यान यामुळे अंतराळात ९५ टक्के कचरा निर्माण झाल्याचे संशोधकांनी सांगितले. अंतराळात निर्माण झालेला हा कचरा हजारो वर्षे अंतराळात तंरगत राहतो, त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे एअरोस्पेस इंजीनिअर आणि अंतराळ अभ्यासक बिल ऐलोर यांनी सांगितले. रशिया, चीन आणि अमेरिकेकडून अंतराळात सर्वाधीक कचरा निर्माण करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. चंद्रावर गेलेल्या अनेक अंतराळवीरांनी त्यांच्या यानातील अनेक वस्तू चंद्रावर सोडल्या आहेत. अमेरिकेच्या अपोलो ११ मोहिमेत अंतराळावीरांनी १०० पेक्षा जास्त वस्तू चंद्रावरच सोडल्या होत्या. चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळवीरांनी यांत्रिक सेंसर सोबत अनेक वस्तू तेथेच सोडल्या होत्या. अंतराळवीर यानाचे वजन कमी करण्यासाठी आणि कमी इंधनात परतीचा प्रवास करण्यासाठी अनेक वस्तू आणि उपकरणे चंद्रावरच सोडतात. त्यात मोठ्या मशीनरी, कार्बन फायबर आणि दुर्घनाग्रस्त झालेले ऑर्बिटरचा समावेश असतो. तसेच खाण्यापिण्याच्या वस्तूंचे पॅकेट्स,टीव्ही कॅमेरा, फिल्म मॅगेझीन, कंटेनर आणि डिस्पोझल कंटेनर यांचाही समावेश आहे. अमेरिकेकडून चंद्रावर एक सिलिकॉन डिस्कही सोडण्यात आली आहे. त्यात अमेरिकेचे ३७ वे अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि इतर ७५ आंतरराष्ट्रीय नेत्यांचे रेकॉर्ड केलेले संदेश होते. अमेरिकेच्या अंतराळवीरांनी चंद्रावरून लहान मोठ्या आकाराचे ३८० किलोची दगडही आणले होते. त्यांची किंमत अब्जावधी डॉलरच्या घरात आहे. मात्र, संशोधनातून चंद्राबाबतची माहिती मिळाली असली तरी चंद्र, शुक्र, मंगळ आणि अंतराळात वाढणारा कचरा ही गंभीर बाब असल्याचे संशोधकांनी सांगितले. 
  Print


News - World | Posted : 2019-09-08


Related Photos