विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश, ऑर्बिटरने काढले लँडरचे फोटो


वृत्तसंस्था / बंगळुरू :  चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने शेवटच्या टप्प्यात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना निराशा पत्करावी लागली होती. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे. चंद्रावर विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी दिली आहे. “ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असून संपर्क झालेला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत”, अशी माहिती सिवान यांनी दिली.
देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’ चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि उत्साहाने भरलेल्या ‘इस्रो’च्या मुख्यालयात निराशेचे मळभ पसरले होते.  या चांद्रमोहिमेतील शेवटच्या १५ मिनिटांचा थरार सुरू असतानाच ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला होता. मात्र, “इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला असला तरी पुढचे १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल”, असे इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी शनिवारी स्पष्ट केले होते.  Print


News - World | Posted : 2019-09-08


Related Photos