'तो' जोडा काय अधिकाऱ्यांना मारायचा काय ? रामदास जराते यांचा प्रशासनाला सवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा प्रशासन आणि कामगार अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना केल्या जात असलेल्या साहित्य वाटपात मोठा घोळ करण्यात येत असून काही कामगारांना पेटीसोबत  चटई, मच्छरदाणी मिळालीच नाही तर दिला जाणारा दहा नंबरचा एकच जोडा दिला जात आहे. हा एकच जोडा काय घोळ करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कामगारांनी मारायचा काय ? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते यांनी केला आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी    सरकारच्या काळात १९९६ च्या इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम व महाराष्ट्र शासनाच्या २००७ च्या नियमान्वये २०१३ व २०१४ मध्ये बांधकाम व इतर कामगारांना सेफ्टी कीट देण्याचे ठरविले होते. भाजप - सेनेच्या युती सरकारने यासाठी तरतुद केली नसल्याने वेळोवेळी डाव्या कामगार संघटनांनी आवाज उठविला होता. आता या योजनेचे श्रेय घेण्यासाठी ऐन निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना घाईगडबडीने नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटप करण्यात येत आहे. मात्र कामगारांना दिल्या जाणाऱ्या साहित्यात सर्वांना दहा नंबरचा बुट दिला जात असून अनेकांच्या पेटीत एकच बुट व अर्धवट साहित्य दिल्या जात आहेत. याबाबत कामगारांनी विचारणा केल्यास साहित्य वाटप करणारे कर्मचारी दमदाटी करीत असून पेटीत जे मिळाले ते निमूटपणे घेवून जा नाहीतर तुमच्या खात्यात पाच हजार जमाही होणार नाही आणि साहित्यही भेटणार नाही,असे हेकेखोर उत्तर दिले जात आहे.
सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सदर साहित्य वाटप योग्य पध्दतीने होण्यासाठी नियोजन करावे  व साहित्य वाटपातील घोळ तसेच 
 कामगारांना होणारा त्रास थांबवावा,अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते यांनी केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos