पावसामुळे रद्द झालेली गडचिरोली न.प. ची सर्वसाधारण सभा ९ सप्टेंबरला होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
  प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सकाळपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर परिषदेमध्ये पाणी शिरले. आवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काही सदस्य कार्यालयात पोहचू शकले नाहीत. मुख्य प्रवेशद्वारावरूनच परत जावे लागले. यामुळे सदर सभा रद्द करण्यात आली असून ९  सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी नगरसेवक सतिश विधाते व रमेश चौधरी हे सकाळी ११.३०  वाजता दाखल झाले. तसेच नगराध्यक्षा योगिताताई पिपरे व नगरसेवक प्रमोद पिपरे आणि इतर नगरसेवक ११.४५ वाजता सभेसाठी आले. मात्र अतिवृष्टीमुळे नगर पालिकेच्या आवारात कमरेच्या वर पाणी साचून होते. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावरूनच आल्यापावली पदाधिकाऱ्यांना परत जावे लागले. 
नगर परिषदेतील सभागृह तसेच मुख्याधिकारी यांच्या कक्षासह सर्वच विभागात तब्बल २ फुट पाणी साचले होते. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कार्यालयीन दस्तऐवज खराब होउ नये म्हणून टेबलवर तसेच उंच जागेवर ठेवले. दुपारी ३ वाजता प्रत्येक विभागात जमा झालेले पाणी कमी झाले. मात्र आवारात दोन फुट पाणी जमा होते. यामुळे सभा रद्द करण्यात आली. आता ९ सप्टेंबर रोजी सभा होणार असून सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांनी केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-04


Related Photos