साईबाबा संस्थानच्या संकेतस्थळावर स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाचे गेटवे व नेटबॅंकींग सुविधा सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संकेतस्‍थळावर स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाचे गेटवे व नेटबॅंकींग सुविधा सुरु करण्‍यात आली असून या सुविधेच्‍या करारावर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया, महाराष्‍ट्राचे मुख्‍य व्‍यवस्‍थापक जी.रविंद्रनाथ यांनी स्‍वाक्षरी केली.
याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री आकाश किसवे, सुर्यभान गमे, दिलीप उगले, अशोक औटी, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया, महाराष्‍ट्राचे व्‍यवस्‍थापक देवेंद्र कुमार, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अनिल शिंदे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना  मुगळीकर म्‍हणाले, जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातुन श्री साईबाबांच्‍या  समाधीच्‍या दर्शनासाठी साईभक्‍त शिर्डी येथे येतात. या येणा-या साईभक्‍तांना श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन सुखकर व्‍हावे म्‍हणून ऑनलाईन दर्शन/आरती पासेस, आगाऊ रुम बुकींग व देणगी सुविधा online.sai.org.in या संकेतस्‍थळावर आणि मोबाईल ॲप्‍सव्‍दारे उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहे. अनेक वेळा संकेतस्‍थळावर आणि मोबाईल ॲप्‍सवर भक्‍तांना ई-पेमेंट करताना व्‍यत्‍यय येत होता. यामुळे संस्‍थानच्‍या वतीने दिनांक ०७ जुन २०१९ रोजी संकेतस्‍थळावर व दिनांक १९ जुन २०१९ रोजी संस्‍थान मोबाईल ॲप्‍सवर स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाचे गेटवे व नेटबॅंकींग सुविधा सुरु करण्‍यात आली होती. यामध्‍ये संकेतस्‍थळावर ३७ हजार ६२२ यशस्‍वी   ट्रांजेक्‍शन झाले असून याव्‍दारे ३ कोटी ४७ लाख ८१ हजार २८७ रुपयांचे यशस्‍वी ई-पेमेंट झाले आहे. तर मोबाईल ॲप्‍सवरुन ४ हजार ९८८ यशस्‍वी ट्रांजेक्‍शन झाले असून याव्‍दारे ३९ लाख ६३ हजार ७०२ रुपयांचे यशस्‍वी ई-पेमेंट झाले आहे. अशा या सुविधेच्‍या करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली असून यापुढे ही सुविधा अविरत सुरु राहाणार आहे.
या सुविधेमुळे ऑनलाईन ई-पेमेंटकरीता अजून एक पर्याय उपलब्‍ध होणार असून साईभक्‍तांना विना अडथळा संस्‍थानच्‍या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेता येणार असल्‍याचे ही  मुगळीकर यांनी  सांगितले.
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-04


Related Photos