पावसाचा कहर, गडचिरोली शहर जलमय


- जिकडे - तिकडे पाणीच पाणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ४ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने कहर केला असून संपूर्ण शहर जलमय झाले आहे. शहरातील अनेक नागरीकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे चांगलीच फजीती झाली आहे.
शहरातील चामोर्शी मार्ग, चंद्रपूर मार्ग, धानोरा मार्ग, विसापूर मार्ग, आरमोरी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. चामोर्शी मार्गावर  राधे इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे जवळपास १ ते दीड तास वाहतूक ठप्प पडली होती. अनेक वाहनधारक मिळेल त्या मार्गाने वाहने काढत होते. राधे इमारतीच्या परिसरातील गल्लीबोळात ३ ते ४ फुट पाणी होते. या परिसरात अनेक नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. पोटेगाव बायपास मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे रस्ता पूर्णपणे उखळून गेला आहे. चंद्रपूर मार्गावरील बजाज शोरूमसमोरील नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी होते. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. आयटीआय चौकसुध्दा जलमय झाला होता. चंद्रपूर मार्गावरील अनेक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विसापूर मार्गावरही पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद होती. सकाळपासूनच आलेल्या मुसळधार पावसाचा नागरीकांनी रस्त्यांवर येउन आनंद लुटला. मात्र अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान सहन करावे लागले आहे.
गडचिरोली नगर परिषदेचे आवार नेहमीप्रमाणे तुडूंब भरले आहे. नगर परिषदेच्या आवारातील संपूर्ण वाहने धानोरा मार्गावर काढून ठेवण्यात आली आहेत. सध्या नगर परिषदेचे पटांगण तलावासारखे दिसत आहे. नगर परिषदेच्या काही कक्षांमध्येही पाणी शिरले आहे. यामुळे कार्यालयात जाणेही कठीण झाले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. आणखी पाउस आल्यास नागरीकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-04


Related Photos