ब्युटी अ‍ॅन्ड स्पॉ च्या संचालिकेकडून लाच रक्कम व शरीरसुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर  :
स्पॉ अ‍ॅन्ड ब्युटी सेंटरच्या संचालिकेवर एमपीडीए ची कारवाई न करण्यासाठी ३५ हजारांची लाच व मित्रांसाठी ३ मुली शरीर संबंध ठेवण्यासाठी पुरविण्याची मागणी करणारे सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा नागपूर शहर येथील सहाय्यक फौजदार आणि पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
दामोधर संपतराव राजुरकर (५६) असे सहाय्यक फौजदाराचे तर शितलाप्रसाद रामलखन मिश्रा (५१) असे पोलिस हवालदाराचे नाव आहे. २५ हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारकर्ती काचीमेठ अमरावती रोड नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीचे ब्युटी अ‍ॅन्ड स्पॉ सेंटर  आहे. व्यवसाय करताना मागील दोन वर्षात वाडी पोलिस ठाणे व सामाजिक सुरक्षा विभाग नागपूर शहर यांनी तिनदा स्पॉ सेंटरवर धाड टाकली होती. तिच्यावर एमपीडीए ची कारवाई न करण्याकरीता सहाय्यक फौजदार दामोधर राजुरकर व पोलिस हवालदार शितलाप्रसाद मिश्रा यांनी ३५ हजारांची लाच मागितली. तक्रारकर्तीने याबाबत एसीबीकडे धाव घेतली. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे भंडारा येथील पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांनी तक्रारकर्तीने केलेल्या तक्रारीची शहनिशा करून काल ३ सप्टेंबर रोजी सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपींनी २५ हजारांची लाच स्वीकारण्याची दर्शविली. तसेच मित्रांकरीता ३ मुली शरीरसुखासाठी पुरविण्याची मागणी केल्याने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दोघांच्याही घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ निर्माण झाली आहे. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर,  नापोशि अश्विन गोस्वामी, पराग राऊत, सचिन हलमारे, पोलिस शिपाई सुनिल उखडे, महिला पोलिस शिपाई रसिका वंâगाले, रोशनी पटले, चालक शिपाई दिनेश धार्मिक यांनी केली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-04


Related Photos