महत्वाच्या बातम्या

 आयुष्मान कार्ड काढण्यात नगर राज्यात पहिल्या स्थानावर : गेल्या सहा महिन्यांत काढले १० लाख कार्ड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अहमदनगर : ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड आहे त्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार शासनाकडून दिले जात आहेत. पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ३१ लाख ६५ हजार जणांना हे कार्ड वाटपाचे उद्दिष्ट आहे.

त्यापैकी आतापर्यंत एकूण १३ लाख ७६ हजार कार्ड वाटून झाले आहे. दरम्यान, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गेल्या सहा महिन्यांत नगर जिल्ह्याने १० लाख कार्ड वाटले आहेत. राज्यात हा आकडा सर्वाधिक आहे. शासनाने आता पंतप्रधान जनआरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अशा दोन्ही योजना एकत्र करून एकच आयुष्मान कार्ड वाटप सुरू केले आहे. यावर कुटुंबातील सदस्यांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. दरम्यान हे कार्ड काढण्याची मोहीम २०१८ पासूनच सुरू आहे; मात्र तेव्हा त्याला एवढा प्रतिसाद नव्हता. नंतर शासनाने १५ सप्टेंबर २०२३ मध्ये या योजनेत आणखी लाभ जोडून योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला. या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात तब्बल १० लाख कार्ड वाटप झाले. हा आकडा राज्यात सर्वाधिक असून नगर जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर आहे.

कागदपत्रे काय लागतात? 
आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेचे कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड, आधार सोबत लिंक मोबाइल क्रमांक लागतो. आयुष्मान ॲपद्वारे आपण स्वतःचे आयुष्मान कार्ड बनवू शकता.

पाच लाखांपर्यंत मोफत उपचार 
नगर जिल्ह्यात ३१ लाख ६५ हजार नागरिक आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजनेचे लाभार्थी असून, आता महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात येणार आहे. ही संख्या ४७ लाखांपर्यंत आहे. त्यांनाही पुढील टप्प्यात हा लाभ मिळणार आहे.

कोठे काढाल कार्ड?
तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुमच्या अंगठ्याचा ठसा देऊन आयुष्मान कार्ड काढू शकता. यात तुम्हाला सीएससी केंद्रावरील केंद्रचालक मदत करतील. आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी आशा सेविका आणि योजनेच्या मान्यताप्राप्त रुग्णालयाला भेट द्यावी. त्यानंतर संबंधित कार्ड आशा सेविकांमार्फत आपल्या घरी पोहोच केले जाईल; तसेच आयुष्यमान ॲपवरही स्वत: कार्ड काढता येते.

काय आहे आयुष्मान भारत कार्ड?
आयुष्मान भारत योजना ही केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्डप्रदान करते. या योजनेअंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे १२०९ उपचारांकरिता प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार नागरिक मोफत मिळवू शकतात.

रुग्णालयात कोणतीही समस्या असल्यास आरोग्य मित्राला भेटून लाभ घेता येतो. आयुष्मान कार्ड (ई-कार्ड), फोटो ओळखपत्र (आधारकार्ड) जनआरोग्य योजनेतून रुग्णावर पूर्णपणे मोफत उपचार केले जात आहेत. योजनेत समाविष्ट असलेले रुग्णालय रुग्णांकडून पैसे मागत असेल तर त्या रुग्णालयातील आरोग्य मित्रांकडे तक्रार करावी. 





  Print






News - Rajy




Related Photos