उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी मीठ-पोळी खाण्यास मजबूर, बातमी देणाऱ्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ :
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहारात मीठासोबत पोळी खावी लागत असल्याचे वृत्त देणाऱ्या पत्रकारावरच प्रशासनाकडून गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. पवन जयस्वाल या पत्रकाराने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या 'मिड डे मिल' अंतर्गत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची पोलखोल केली होती. त्यानंतर आता या पत्रकारावर राज्य सरकारकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ ऑगस्टला उत्तर प्रदेशमधील जनसंदेश टाइम्सचे पत्रकार पवन जयस्वाल यांनी मिर्झापूर येथील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना मिड डे मिलच्या नावाखाली मीठ आणि पोळी खावी लागत असल्याचा एक व्हिडीओ समोर आणला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर मिर्झापूर जिल्हा प्रशासनाने याची चौकशी केली होती. त्यानंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे दोन शिक्षकांवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र या पत्रकारावर उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनूसार, जनसंदेश टाइम्सच्या स्थानिक पत्रकाराने व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर वृत्तसंस्थेला पाठवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यासाठी पवन जयस्वाल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   Print


News - World | Posted : 2019-09-03


Related Photos