बैल चारण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यावर दोन अस्वलांचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
बैल चारण्यासाठी जंगल परिसरात जात असलेल्या शेतकऱ्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज २ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.
मासु कोमटी तिम्मा रा. लष्कर ता. भामरागड असे गंभीर जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. मासू तिम्मा यांच्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला. त्यांचे पोट फाटल्यामुळे चक्क आतडे बाहेर आले. तसेच पायावर, चेहऱ्यावर तसेच शरीराच्या अनेक भागांवर अस्वलांनी ओरबाडले आहे. कसाबसा जीव वाचवून मासु तिम्मा यांनी गावाकडे धाव घेतली. यानंतर त्यांना भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डाॅ. वानखेडे यांनी प्राथमिक उपचार केला. प्रकृती धोकादायक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत गंभीर जखमी तिम्मा यांचा मुलगा प्रकाश तिम्मा याने वनविभागाकडे अर्ज करून उपचारासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे लष्कर परिसरात अस्वलांची दहशत पसरली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-02


Related Photos