कोयनगुडा जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना घडविले नागपूरचे दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या वतीने तालुक्यातील कोयनगुडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी  नागपूर येथे सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीदरम्यान नागपूर येथील विविध स्थळांना भेटी देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जि.प. अध्यक्ष, उपशिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य आदींशी संवाद साधला.
कोयनगुडा येथील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय सहल आयोजित करण्यात आली. सहलीकरीता ४८  हजार रूपयांचा निधी देवून अविस्मरणीय सहल घडविण्यात आली. या उपक्रमासाठी तहसीलदार कैलास अंडील यांनी विशेष पाठपुरावा केला. मुख्याध्यापक विनित पद्मावार यांच्या प्रयत्नाने विद्याथ्र्यांना संधी मिळाली. २७  ते २९  ऑगस्ट  दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध स्थळांना भेटी दिल्या. २७  ऑगस्ट  रोजी कोयनगुडा जवळील नाल्याला पाणी असल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना उचलून बसपर्यंत आणले. नायब तहसीलदार निखील सोनवणे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे व बॅंक ऑफ  महाराष्ट्राचे  व्यवस्थापक यांनी सहलीच्या बसला हिरवी झेंडी दाखविली. यानंतर गडचिरोली जवळील सेमाना येथे विद्यार्थ्यांना जेवन देण्यात आले. यानंतर मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना चाॅकलेट खाउ घालण्यात आले. यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. तसेच जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर व उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्याही विद्यार्थ्यांनी भेटी घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी ४२  - ४३  चा पाढा म्हणून दाखविल्यानंतर  जि.प. अध्यक्षांनी पाच हजारांचे बक्षिस दिले.  डायटचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांची भेट घेतली. 
नागपूर येथे अंबाझरी उद्यान, दीक्षाभूमी, रमन विज्ञान केंद्र, माॅल आदी ठिकाणी भेटी दिल्या. बर्डी ते विमानतळ असा मेटो प्रवास विद्यार्थ्यांनी केला. यासाठी अभिषेक चौधरी  यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विमान पहायला मिळाले. क्रीकेट स्टेडीयम दाखविण्यात आले. यानंतर आनंदवन येथील प्रकल्पाला भेट देवून डाॅ. विकास आमटे यांची भेट घेतली.
सहलीकरीता रोटरी क्लब नागपूर यांनी निवास, भोजन, नाश्ता, पाणी आदी सोय केली. तसेच गाईडही दिले. सर्व मुलांना टोपी, भेटवस्तू दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक विनीत पद्मावार, सहाय्यक शिक्षक वसंत ईष्टाम व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष हबका या सर्वांनी सहलीकरीता सहकार्य केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-01


Related Photos