आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार


वृत्तसंस्था / औरंगाबाद :   युवासेना नेते आदित्य  ठाकरे  अखेर विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य ठाकरे वरळी, मालेगाव किंवा दिग्रसमधून लढणार असून, याबाबत लवकर निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी शनिवारी दिली. 
 जन आशीर्वाद यात्रेसाठी दोन दिवसांपासून आदित्य औरंगाबाद  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. वरळीमधून आदित्य यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा ठराव तेथील नागरिकांनी  केला आहे. याबद्दल पत्रकारांनी ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, 'जनतेने आदेश दिला तर निवडणूक लढवू. वरळी प्रमाणेच मालेगाव, दिग्रस येथून देखील मागणी होत आहे. त्यामुळे या तिन्ही पैकी कुठून निवडणूक लढवायची याचा निर्णय आपण लवकरच घेणार आहोत.' मुख्यमंत्री तुमचे कौतुक करतात. तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री व्हायला आवडेल की एखाद्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल असे विचारले असता ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी माझे कौतुक केले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना - भाजप आम्ही सोबत आहोत आणि सोबत काम करीत राहू. जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. ७६ मतदारसंघ फिरलो. त्यातून नागरिकांचे विविध प्रश्न लक्षात आले. शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात आला. शिवसेनेमुळे दहा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला, परंतु अद्याप कर्जमुक्ती पूर्णपणे झाली नाही. शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, पण ती गावापर्यंत पोचली नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याची संधी सरकारला दिली पाहीजे. पूर, दुष्काळाची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारसह सर्व राजकीय पक्षांनी जमिनीवर उतरून संकटात सापडलेल्यांना मदत करावी. एकमेकांवर आरोप करण्यात वेळ घालवू नये,' असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-01


Related Photos