देसाईगंज - ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून अज्ञात महिलेने घेतली उडी!


- वाहून जात असलेल्या महिलेला पाहून ठाणेदारांनी घेतली नदीत उडी 
- महिलेचा शोध सुरू 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
देसाईगंज - ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून एका महिलेने सकाळी ११:३० च्या सुमारास उडी घेतली. सदर महिलेविषयी अजून कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नसून महिलेचा शोध व  तापसकार्य पोलिसांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी नदीत महिला वाहून जाताना दिसताच स्वतः उडी घेतली. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे महिलेपर्यंत त्यांना पोहचता आले नाही. 
 महामार्गावरून ये - जा करणाऱ्या  काही लोकांना वैनगंगा नदीवरील पुलावर एक महिला खूप वेळ पर्यंत बसून असलेली दिसली.  अनेक लोकांना त्याबद्दल आशंका येत होती.  परंतु  लोक नदीवर फिरण्याकरिता येत असतात असे समजून कोणीही त्या महिलेला विचारणा केली नाही. परंतु काही वेळानंतर महिलेने नदीत उडी घेतल्याची   आरडाओरड लोकांनी  सुरू केली.  त्यातल्या काही लोकांनी देसाईगंज पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. देसाईगंज पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्यासह पोलिसांनी  घटनास्थळ गाठले.  घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांनी तपासकार्य सुरू केले व महिलेचा  शोध सुरू केला .परंतु मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीला वेगवान पाण्याचा प्रवाह असल्याने महिलेचा शोध घेणे फार कठीण झाले. देसाईगंज पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या बोटीच्या साहाय्याने त्या महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी आपल्या चाणाक्षपणाने आधीच धाव घेत कोंढाळा गावातील रेतीघाटाच्या मार्गावरून थेट नदीपात्र गाठले. इतक्यात त्या महिलेचे शव येतांना दिसले पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट नदीपात्रात उडी घेतली व नदीपात्रातील खोलवर पाण्यात जाऊन  त्या महिलेचा एक ते दीड की.मी. पर्यंत पाठलाग केला.  परंतु पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने व जवळ इतर कोणत्याही व्यक्तीचे सहकार्य नसल्याने त्यांना एकदम खोलवर पाण्यात जाता आले नाही. कदाचित ती महिला मृत पावली असल्याने तिच्या शरीराचा पाठिकडील भाग वर आल्याचे दिसले व पाण्याच्या प्रवाह सोबत ती महिला वाहून गेली .पुढील गावात तसेच पुढे असलेल्या आरमोरी व गडचिरोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. या घटनेचा अधिक तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत. बहादूर व कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-31


Related Photos