अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बँकांचे विलीनीकरण होणार , देशात १२ मोठ्या सरकारी बँका राहणार : सीतारमण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर एवढी बनवण्यासाठी काम सुरू असून आपण तो पल्ला निश्चितच गाठू असा विश्वासही सीतारमण यांनी व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बँका मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील बँकांचे विलीनीकरण करून देशात सार्वजनिक क्षेत्रातील 12 मोठ्या बँक कार्यरत राहतील असेही सीतारमण यांनी स्पष्ट केले.
याआधी 23 ऑगस्टला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. सीतारमण यांनी शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. आगामी काळात पंजाब नॅशनल बँक,ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असून या विलीनीकरणामुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक तयार होणार आहे. त्या बँकेची उलाढाल 17.95 लाख कोटींची असेल असे त्यांनी सांगितले. तसेच कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचेही विलीनीकरण करण्यात येणार असून ही देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक असेल. त्याची उलाढाल 15.20 लाख कोटी असेल. त्याचबरोबर बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ती देशातील पाचव्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आहे. तसेच इंडियन बँक आणि इलाहाबाद बँकेचे विलीनीकरण होणार आहे. ती देशातील सातव्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार असून त्याची उलाढाल 8.08 लाख कोटी रुपयांची असेल, असे सीतारमण यांनी सांगितले. सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेनंतर मंदीत असलेल्या शेअर बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून आली.  Print


News - World | Posted : 2019-08-31


Related Photos