अर्थसंपन्न महिला निर्माण झाल्यानंतरच अत्याचारमुक्त होईल : विजया रहाटकर


-  चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांकरिता प्रज्वला योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्य महिला आयोगाचे काम या अत्याचार झाल्यास दरम्यान महिलांना न्यायिक मदत करणे, हेच नसून जोपर्यंत महिलांमध्ये अर्थसंपन्नता येणार नाही. तोपर्यंत महिला अत्याचार मुक्त होणार नाही. म्हणून राज्य शासनाच्या मदतीने राज्य महिला आयोगाने प्रज्वला योजना सुरू केली आहे. या माध्यमातून महिला अर्थसंपन्न होतील असा दृढ विश्वास आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. प्रज्वला योजनेअंतर्गत  काल  २९ ऑगस्ट  रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी महिला आयोगाच्या सदस्य वनिताताई कानडे, प्रज्वला योजनेचे अध्यक्षा दिपाली मोकाशी, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी सभापती अर्चनाताई जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  पचारे, जिल्हा समन्वयक वनिता घुमे, महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे, राहुल ठाकरे, मार्गदर्शिका रेखाताई कोठेकर, पंचायत समिती सदस्य विकास जुमनाके, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके प्रमुख्याने मंचावर उपस्थित होते.
राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रज्वाला योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांकरिता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांनी उपस्थित महिलांना संबोधित केले. यामध्ये प्रज्वला योजनेच्या माध्यमातून वर्किंग वुमन नंतर वंडर वुमन निर्माण करायची आहे. महिलांना स्वतःची प्रतिमा निर्माण करायची आहे. महिलांवरील अत्याचारांचे खरं कारण आर्थिक मागासलेपण आहे. राज्य महिला आयोगाचे काम हे न्यायिक गोष्टी साठी मदत करणे, कौटुंबिक वाद निपटने, यापुरतेच मर्यादित नाही. तर महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. महिलांना अर्थसंपन्न होता यावे. त्यातून त्यांचा विकास होऊन त्यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना उपस्थित महिलांना समजून सांगितल्या. तसेच महिलांच्या संरक्षणासाठी तसेच विकासासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासनाने तयार केलेल्या कायद्याविषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमात प्रत्येक महिलांना एक कीट देण्यात आली. त्यामध्ये योजना तसेच कायदे याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकांचा समावेश होता. त्या पुस्तिकांचा महिलांनी जाणीवपूर्वक अभ्यास करावा, तसेच  कुठेही महिलांवर अत्याचार झाला तरी  राज्य महिला आयोग  प्रत्येक महिलेच्या पाठीशी  उभे  असून पीडित महिलेने भीती मुक्त होऊन स्थानिक यंत्रणेकडे दाद मागण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी राज्याचे वित्त, नियोजन, विशेष सहाय्य, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओद्वारे महिलांशी संवाद साधला. सरकारच्या प्रत्येक योजनांवर महिलांचा अधिकार असून त्याकरिता हे सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच प्रज्वला योजनेचे अध्यक्षा दिपाली मोकाशी यांनी प्रज्वला योजनेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच समाज कल्याण सभापती यांनीसुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

काय आहे प्रज्वला योजना?

राज्यामध्ये सुमारे 5 लाख बचत गट कार्यरत असून त्यांच्याशी सुमारे १ कोटी १० लाख महिला जोडलेल्या आहेत. बचत गट आर्थिक सक्षमीकरणाच्या कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्वाला योजना आकारास आली आहे. प्रज्वाला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महिला बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एक जिल्हा एक वस्तू अशी क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवण्यासाठी बचत गट बाजार जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे, अशा पद्धतीने प्रज्वाला योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-30


Related Photos