मोदी आणि फडणवीस सरकारने कोणत्याही समस्या मार्गी लावल्या नाहीत : नाना पटोले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
केंद्रातील नरेंद्र मोदी  आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या भौतिक व सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष करीत  असून कोणत्याही समस्या मार्गी लावल्या नाहीत. असे असतानाही  महाजानदेश यात्रा काढून मुख्यमंत्री राज्यभर दौरे करीत आहेत. मात्र सरकारचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी तसेच राज्यात पुन्हा काँग्रेसचे पारदर्शक सरकार आणण्यासाठी आपण महापर्दाफ़ाश यात्रा काढली आहे, असे  काँग्रेसचे प्रचार समितीप्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी आज  पत्रकार परिषदेत सांगितले.
महापर्दाफाश यात्रेनिमित्त गडचिरोलीत आलेले माजी खासदार नाना पटोले यांनी आज २९ ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आदिवासी नेत्या कुसुम आलाम, युवक काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर,  देवाजी सोनटक्के, जि.प.सदस्य मनोहर पोरेटी, वामनराव सावसाकडे आदी उपस्थित होते. 
पुढे बोलताना पटोले म्हणाले,  आदिवासी भागाच्या विकासासाठी निधी देण्याची संवैधानिक व्यवस्था आहे. परंतु आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बंधारे बांधण्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. ह्या निविदा ५ टक्के अधिक रकमेच्या आहेत. याचे काम स्थानिक पातळीवरील कंत्राटदाराला न देता आंध्रपदेशातील तिरुपती येथील एका कंत्राटदाराला  देण्यात आले आहे. हा माणूस वित्तमंत्र्यांच्या मर्जीतील असून, कोणत्याही तांत्रिक बाबी पूर्ण न करता पारंपरिक पद्धतीने बंधाऱ्यांचे काम केले जात आहे. यातून पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. 
३३ कोटी वृक्षलागवड योजनेत लावण्यात आलेली रोपटे कुठून खरेदी केली, त्यांचे  संगोपन किती झालं, रोपे खरेदीसाठी किती पैसे खर्च केला या प्रश्नांची उत्तरे मिळणं आवश्यक असून, या योजनेचे सोशल ऑडिट करावे, अशी मागणही पटोले यांनी केली. जिल्ह्यात ओबीसी आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. परंतु भाजप सरकारने पाच वर्षांत हे काम केले नाही. निवडणूक आली की ओबीसींना आश्वासन द्यायचे आणि सत्ता येताच त्यांना जमिनीत गाडायचे, असा हा प्रकार आहे.  येथे रेल्वे येऊ शकली नाही. अनेक प्रश्न सुटले नाहीत, अशी टीका पटोले यांनी केली.
सुरजागड पहाडावरुन लॉयड मेटल्सने किती खनिज नेले, सरकारकडे किती रॉयल्टी भरली, याची माहितीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध नाही. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दोन वर्षात भिलाई सारखा लोह प्रकल्प उभा करू असेही नाना पटोले म्हणाले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-29


Related Photos