साहित्य घेण्यासाठी बांधकाम कामगारांची झुंबड, गर्दीमुळे धक्काबुक्कीचे प्रकार


- गैरसोय होत असल्याची कामगारांची ओरड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /गडचिरोली :
कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. गडचिरोली शहरात ३ साहित्य वितरण केंद्र सुरू होते. मात्र दोन केंद्र बंद करण्यात आल्याने सध्या चंद्रपूर मार्गावरील नवेगाव परिसरात एक केंद्र सुरू आहे. या केंद्रावर शेकडो कामगारांनी साहित्य घेण्यासाठी गर्दी केली असून कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे. गर्दीमुळे या ठिकाणी धक्काबुक्की चे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नोंदणी केलेल्या कामगारांना साहित्य असलेली पेटी वितरीत करण्यात येत आहे. यासाठी गावा - गावातून नागरीक सकाळपासूनच गर्दी करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत नागरीक या ठिकाणी रांगेत उभे राहत आहेत. सकाळपासून उभे राहुनही कधी कधी दोन दोन दिवस त्यांना साहित्य मिळत नसल्याचेही कामगारांनी सांगितले. चंद्रपूर मार्गावरील वितरण केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुरूष तसेच महिलांची सुध्दा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. हे केंद्र मुख्य मार्गालगत असल्यामुळे या ठिकाणी गर्दी होत आहे. दोन्ही बाजूस वाहनेसुध्दा उभी केली जात आहे. यामुळे अपघाताचाही धोका बळावला आहे. यामुळे साहित्य वितरण केंद्र वाढवावे तसेच योग्य नियोजन करून साहित्य वितरण करावे, अशी मागणी होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos