लाठीमार झेलणाऱ्या शिक्षकांच्या पाठिंब्यासाठी विधान परिषद आमदारांचे ठिय्या आंदोलन


वृत्तसंस्था / मुंबई :  पोलिसांचा लाठीमार झेलणाऱ्या शिक्षकांच्या पाठिंब्यासाठी विधान परिषद आमदारांनी काल विधान भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. विधान भवनासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करीत विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळालेच पाहिजे ही मागणी लावून धरली.
लाठीहल्ला झाला त्यामध्ये शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे संतप्त झालेले शिक्षक आमदार गाणार यांना पाठिंबा देण्यासाठी विधान भवनासमोर ठिय्या देऊन बसले. आमदार विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, दत्ता देशपांडे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, सुधीर तांबे यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते. या शिक्षक आमदारांना विधान भवनात बसण्यात मज्जाव करण्यात आल्यानंतर आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या दिला. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील या आमदारांना पाठिंबा देण्यासाठी विधान भवनात पोहोचले. त्यानंतर पुन्हा या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केले. भरपावसातही हे आंदोलन सुरूच होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी या आंदोलनकर्त्या आमदारांची भेट घेतली. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापतींची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शिवसेना प्रवक्त्या, आमदार मनीषा कायंदे यांनीही शिक्षकांवर केलेल्या लाठीमाराचा निषेध केला.

आज  बैठक

शिक्षकांच्या मागण्यांबाबत शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी आज बुधवारी सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षक आमदारांना दिली. त्यानंतर आमदारांनी आंदोलन स्थगित केले.  Print


News - Rajy | Posted : 2019-08-28


Related Photos