झुम कार ॲपवरून वाहने बुक करून दारूची तस्करी, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
दारू तस्कर नवनवीन शक्कल लढवून तस्करी करीत आहेत. मात्र पोलिस विभागही अशा दारू तस्करांवर करडी नजर ठेवून आहे. सध्या प्रवाशांसाठी ऑनलाईन वाहने बुक करून सफारी करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. अशाच मोबाईल ॲपद्वारे वाहने बुक करून दारू तस्करी करणाऱ्या ५ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन महागड्या वाहनांसह १८  लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संजय रमेश शिकरवार (४७) रा. नारा रोड नुरी काॅलनी नागपूर, ईरशाद आलम खुर्शीद आलम (२२) रा. जाफर नगर नागपूर, समिर सादीक खान (२७) रा. सदर न्यु काॅलनी छिंदवाडा रोड नागपूर, आकाश शंकर गुप्ता (२६) रा. मानकापुर रतन नगर नागपूर, देवेंद्र रामचंद्र शर्मा (२८) रा. मानकापुर कोराडी रोड नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार आज २७ ऑगस्ट रोजी वरोरा पोलिस ठाण्यात काही इसम दोन चारचाकी वाहनाने नागपूर येथून दारू तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. वरोरा पोलिसांनी नंदोरी टोलनाक्याजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यावेळी एक मारूती ब्रेझा आणि एक महिंद्रा केयुव्ही वाहन येतांना दिसले. दोन्ही वाहनांना थांबवून वाहनांची झडती घेतली असता दारूसाठा आढळून आला. मारूती ब्रेझा क्रमांक एमएच ४३ बीजी ९६१९ मध्ये देशी दारूच्या १ हजार निपा आढळून आल्या. या दारूची किंमत १ लाख रूपये आहे. तर महिंद्रा केयुव्ही क्रमांक एमएच ४३ बीजी ७४६९ मध्ये ८०० निपा आढळून आल्या. या दारूची किंमत ८० हजार रूपये आहे. वाहनांसह एकूण १८ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची चौकशी केली आसता त्यांनी दोन्ही वाहने झुम कार या मोबाईल ॲपद्वारे पैसे देवून किरायाने घेतल्याचे सांगितले. आरोपींविरूध्द वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे २८ हजार रूपये किमतीचे मोबाईल संच १० लाख रूपयांची ब्रेझा कार, ६ लाख रूपयांची महिंद्रा केयुव्ही कार जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनित घागे, पोलिस नायक दीपक दुधे, पोलिस शिपाई निखिल कौरासे, पोलिस शिपाई प्रविण यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-27


Related Photos