वैज्ञानिक होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे काळाची गरज : नगराध्यक्षा योगिता पिपरे


- रामनगर नगरपरिषद शाळेत विज्ञान केंद्राचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
अनुभव हा जीवनातील सर्वात मोठा गुरू आहे. जीवनात प्रत्येक क्षणाला यशस्वी व्हायचं असेल तर संधीचं सोनं करता आले पाहीजे. विज्ञानातून आजच्या जगाविषयी ज्ञान मिळविला पाहीजे. जीवनात चांगल्या व्यक्तिमत्त्वासोबतच वैज्ञानिक होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
 गडचिरोली नगरपरिषदेअंतर्गत असलेल्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक डिजिटल शाळा रामनगर येथे नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र उद्घाटन तथा शालेय साहीत्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.
 नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व स्कूल शूजचे मान्यवरांच्याहस्ते वितरण करण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी धनश्री मेश्राम व श्रावण गड्डमवार यांना मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
 कार्यक्रमास प्रमुख अतिथी महणून नगरसेवक तथा माजी सभापती गुलाबराव मडावी, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक प्रविण वाघरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मधुकर नैताम, ताकसांडे, शा.व्य.स.सदस्य थामदेव महागणकर, मुख्याध्यापक गोहणे, मडावी, जांभुळे, गंधेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, नगरपरिषद शाळांचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. विद्यार्थ्यांचा विकास हाच देशाचा विकास आहे. नगरपरिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक होण्यास त्यांना लागणा-या शालेय साहीत्यांची आवश्यकता पुरविण्यासाठी तत्पर असल्याचेही नगराध्यक्षा पिपरे यांनी सांगितले.
 यावेळी शाळेतील विद्यार्थीनी शिफत शेख व नेहा चिचघरे या विद्यार्थीनींचे शाळेविषयी मनोगत विचारण्यात आले. या विद्यार्थिनींनी सांगितले की, शाळेत छान शिकविले जाते. अभ्यासू वृत्ती जोपासण्यासाठी रामनगर येथील नगरपरिषद शाळा अतिशय चांगली आहे. आम्ही विद्यार्थी वैज्ञानिक होण्याचे शाळेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असेही दोन्ही विद्यार्थींनींनी सांगितले.
 नगरसेवक तथा माजी सभापती गुलाबराव मडावी यांनी सांगितले की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून नेहमी विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी ठेवून आपले ध्येय साध्य करावे, असेही ते सांगितले.
 नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजचे युग हे विज्ञान युग आहे. देशाला वैज्ञानिकाची गरज आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक विज्ञानाचे शिक्षण मिळावे म्हणून नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये बुध्दीमत्ता व कौशल्य असेल तर ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात, असेही ते सांगितले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गोहणे यांनी केले. संचालन शेडमाके तर आभार मने यांनी मानले. यावेळी शिक्षक-शिक्षिका बोकडे, कुमरे, देव्यांग, पिसे, म्हस्के, शेडमाके, पाल, भोयर, बानबले व विद्यार्थी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-27


Related Photos