अरुण जेटली पंचत्वात विलीन , मुलाने दिला मुखाग्नी : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली पंचत्वात विलीन झाले. दिल्लीतील निगमबोध घाटावर मुलगा रोहन याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी आणि मान्यवरांनी शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. 
जेटली यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपमधील अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 
अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जेटलींचे पार्थिव दिल्लीत भाजप मुख्यलयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिली. दुपारी दीड वाजेपर्यंत जेटली यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी दोन वाजता जेटलींचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यविधिसाठी आणण्यात आले. आणि सव्वा तीन वाजेच्या सुमारास जेटलींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि नातलग उपस्थित होते. 
  Print


News - World | Posted : 2019-08-25


Related Photos