महत्वाच्या बातम्या

 ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात नंबर एक : इथेनॉल निर्मितीत होणार वाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : १५ जानेवारी २०२४ पर्यंत देशातील ५०९ साखर कारखान्यात १ हजार ५६३ लाख टन उसाचे गळीत झाले असून त्यातून १४८.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उसाचे गळीत आणि साखर उत्पादनात महाराष्ट्राने आज पर्यंत आघाडी राखली आहे.

ऊस गाळप हंगाम अखेर संपूर्ण देशात किमान ३०५.५० लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे व त्यात ८ ते १० लाख टनाने वाढ होण्याचा अंदाज आहे असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे.

ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक हे तीन राज्ये देशात आघाडीवर असून त्यात त्यांचे योगदान ७५.८३ टक्के आहे. महाराष्ट्रातील १९७ कारखान्यात ५४८.३९ लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून ५१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे तर उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यातून ४६५.६६ लाख टन उसाचे गाळप होऊन ४६.१० लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले. कर्नाटकातील ६९ कारखान्यातुन ३२२.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून ३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या तीनही राज्यातील उभ्या उसाला परतीच्या पावसाने हातभार लावल्याने साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.

मोलॅसिसवर ५० टक्के निर्यात शुल्क लागणार : 
सरासरी साखर उताऱ्यात उत्तर प्रदेश देशात सर्वात पुढे असून तेथे ९.९० टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. त्या खालोखाल तेलंगणाचा क्रमांक असून तेथे साखर उतारा ९.७५ टक्के असा आहे कर्नाटकात साखर उताऱ्याचे प्रमाण ९.६० टक्के असे आहे तर मध्य प्रदेशात साखर उतारा ९.५० टक्के असा आहे. महाराष्ट्रात साखर उतारा ९.३० टक्के असून वाढत्या थंडीने याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गुजरात, बिहार, हरियाणा आणि उत्तराखंड मध्ये साखर उताऱ्याचे प्रमाण प्रत्येकी सरासरी ९.२० टक्के असे आहे.

केंद्र शासनाने सी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात रु ६.८७ प्रति लिटर अशी घवघवीत वाढ केल्याने तसेच मोलॅसिसच्या सरसकट निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याने इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणे अपेक्षित आहे. यामुळे मध्यंतरीच्या काळात झालेल्या नकारात्मक निर्णयामुळे देशाचा इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करण्याचे जे प्रमाण १०.५० टक्क्यापर्यंत घसरले होते त्यामध्ये या वर्षाच्या अखेर पर्यंत किमान १२ ते १५ टक्क्यापर्यंत वाढ होण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos