पुरामुळे फसलेल्या प्रवाशांना पोलिसांनी दिला आसरा


- आलापल्ली - भामरागड मार्गावरील नाल्यांना पूर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
काल २३ ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे आलापल्ली - भामरागड मार्गावरील सर्व नाले भरून वाहत होते. बांडे नदीच्या पुलावरून ५ फुट पाणी वाहत होते.  यामुळे अनेक बसेस व खासगी वाहने अडकून पडले. यामुळे अनेक प्रवासी खोळंबले होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पोलिस दलाने तातडीने प्रवाशांची सोय करण्यात आली. जेवनाची सोय करून महिला आणि पुरूषांसाठी राहण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली. 
२३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भामरागड येथून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस व काळी पिवळी वाहने आलापल्लीकडे जात असताना कोसफुंडी नाला भरून वाहत होता. यामुळे सर्व प्रवासी अडकले. पाणी उतरण्याची वाट पाहत थांबावे लागले. थोड्या वेळात नाल्याचे पाणी कमी झाल्यामुळे नाला ओलांडून वाहने मार्गस्थ झाली. मात्र समोर आल्यानंतर कुडकेली नाल्यावरसुध्दा पाणी होते. नाल्यावरील पाणी कमी झाल्यानंतर आलापल्ली येथे पोहचू असे प्रवाशांना वाटत होते. मात्र आलापल्लीकडून कोणतेच वाहन ताडगावकडे येत नव्हते. याबाबतची माहिती ताडगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी समिर दाभाडे यांना समजल्याने कुडकेली नाल्याजवळ जावून त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी प्रवाशांना नाला ओलांडून न जाण्याची सुचना त्यांनी केली. प्रवाशांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय पोलिस विभागाच्या वतीने ताडगाव पोलिस मदत केंद्रात करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे सर्व प्रवाशांना ताडगाव पोलिस मदत केंद्राकडे रवाना करण्यात आले. जिल्हा पोलिस आणि सिआरपीएफच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस अधिकारी समिर दाभाडे यांनी सुचना देउन तातडीने जेवण तयार करण्यास सांगितले. जेवण तयार करून महिला आणि पुरूषांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.
आज २४ ऑगस्ट रोजी सकाळी सर्व प्रवाशांना चहा देण्यात आला. तसेच पुरपरिस्थितीचा अंदाज घेवून रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी पोलिसांनी दाखविलेल्या आपुलकीबद्दल भावना व्यक्त केल्या. रात्रीच्या वेळी दुर्गम भागात भिती होती. मात्र पोलिसांनी घरच्याप्रमाणे वागणूक दिल्यामुळे कसलाही त्रास झाला नाही. भामरागड तालुक्यातील एका दुर्गम गावातील प्रवाशाने सांगितले की, आमच्या गावात नक्षली येत जात असतात. बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने आमचे हक्काचे जेवण घेवून जातात. मात्र पोलिसांनी पुरामुळे अडकलेल्या सर्व प्रवाशांची कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत केली. याबद्दल पोलिस विभागाप्रती आदर व्यक्त केला. जाताना सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-24


Related Photos