महत्वाच्या बातम्या

 शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचे साक्षीदार व्हा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व तेजस्वी व्यक्तीमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या जाणता राजा महानाट्याचे आयोजन रेल्वे ग्राउंड परिसर, खात रोड, भंडारा येथे १७, १८ व १९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या महानाट्याचे उद्या १७ जानेवारीपासून सायंकाळी ६.३० पासून प्रयोग आहेत.

या महानाट्याच्या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित तर जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, राज्यसभा खासदार प्रुफुल पटेल, खासदार सुनिल मेंढे, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, आमदार नाना पटोले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी उपस्थित राहणार आहे.

समाजातील सर्व नागरिकांनी आबाल वृद्धांनी, महाविद्यालय विद्यार्थ्यांनी, या महानाट्याला हजेरी लावावी व शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचे साक्षीदार होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जाणता राजा महानाट्याचे प्रयोग नागपूरनंतर भंडारा जिल्ह्यात होत आहेत, याबाबत सविस्तर माहिती देणारी पत्रकार परिषद कालच जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी घेतली. या महानाट्यासाठीच्या प्रवेशिका जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्या देण्यात येणार आहेत.

एकूण १५० पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञांचा या महानाट्यात समावेश आहे. जवळपास साडे तीन तास चालणाऱ्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, मुत्सदेगिरी, प्रशासनावरील जरब, सौहार्द, निर्णयशक्ती दर्शविणारे प्रसंग, अफजलखानाचा वध, शाहिस्ते खानाची लाल महालातील कोंडी, छत्रपतींची आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक आदी प्रसंग गतइतिहास डोळयासमोर उभा राहणार आहे. सोबतीला पोवळे, भारुड, गौळणी, गोंधळ, वाघ्या- मुरळी, लावणी, कोळी नृत्य आदी लोककलांची महानाटयातील नेमकी गुंफण रसिकांसाठी  आहे. रंगमंचावरील प्रसंगानुरुप देखावे, घोडे, उंट, तोफांचा वापर, साजेसे नैपथ्य, प्रकाश व संगीत संयोजन, संवादाची उत्तम फेक असलेले हे महानाट्य जिल्हा वासियांसाठी सांस्कृतिक मेजवानी आहे.

या महानाट्याच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, पाल्य, आबाल वृध्दांना शिवछत्रपतींच्या गौरवशाली  इतिहास याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. या महानाट्याचे आजवर १ हजार १०० हून अधिक प्रयोग राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या या तीन दिवसीय महा नाट्याला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी चारचाकी वाहनाकरिता नुतन महाराष्ट्र शाळा मैदान, बसेसकरिता म्हाडा कॉलनी मैदान, खात रोड व दुचाकीकरिता रेल्वे मैदान खात रोड येथे पार्कींगची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos