महत्वाच्या बातम्या

 १९ शहरांत लवकरच होणार डीटूएम ची चाचणी : इंटरनेटविना मोबाइलवर व्हिडीओ स्ट्रिमिंग करता येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर लवकरच व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा देशात सुरू होणार आहे. त्यासाठी डायरेक्ट टू मोबाइल (डीटूएम) प्रणालीची देशातील १९ शहरांमध्ये लवकरच चाचणी होणार असल्याचे माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.
दिल्ली येथे आयोजित ब्रॉडकास्टिंग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चंद्रा बोलत होते. डीटूएम तंत्रज्ञानासाठी ४७०-५८२ मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमचा वापर करण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान वापरात आल्यानंतर फाइव्ह-जीवरील सुमारे २५-३० टक्के व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा याकडे वळली जाईल.

देशात सध्या ८० कोटींहून स्मार्टफोन्स आहेत. त्यावरून प्रसारित होणाऱ्या एकूण माहितीपैकी सुमारे ६९ टक्के माहिती ही व्हिडीओ स्वरूपात आहे.
मोबाइल नेटवर्कवर व्हिडीओ कंटेन्टचा अधिक वापरल्यामुळे वारंवार बफरिंग होते. सध्या देशातील २८ कोटी घरांपैकी केवळ १९ कोटी घरांमध्येच टीव्ही आहे. या तंत्रज्ञानामुळे देशातील टीव्ही नसलेल्या सुमारे ९ कोटी घरांपर्यंत व्हिडीओ सुविधा पोहोचवता येईल, असे चंद्रा म्हणाले.

काय आहे डीटूएम? : आयआयटी कानपूर व सांख्य लॅब्स यांनी विकसित केलेले डीटूएम तंत्रज्ञानामुळे सिमकार्ड वा इंटरनेटशिवाय मोबाइलवर व्हिडीओ पाहता येईल. इंटरनेट सुविधा वा टीव्ही नसलेल्या कुटुंबीयांपर्यंत महत्त्वाची माहिती, आपत्तीविषयक सूचना पोहोचवता येणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos