महत्वाच्या बातम्या

 बारावीच्या विद्यार्थ्यांना देणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे धडे


- गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
-  माहिती देण्यासाठी प्रशिक्षकांची निवड
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत  प्रशिक्षकांचे सोमनाथ येथे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती व्हावी, या धोरणाबाबत त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उकल व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ येथे पार पडले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी म्हणाले की,
बारावी नंतर काय ? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. पुढे पदवीच्या प्रथम वर्षात येऊन विद्यार्थी संभ्रमात असतात की आता काय  करायचे?, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणणानुसार पुढचे शिक्षण होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे, याबाबत त्यांच्या मनात स्पष्टता नाही. हीच स्पष्टता आणून देणे हा उद्देश गोंडवाना विद्यापीठाचा आहे. 

यासाठीच विद्यापीठ आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील काही शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना इतर महाविद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सध्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातील २० टक्के विद्यार्थी कमी झाले आहेत. अनेक विद्यार्थी बारावीनंतर शिक्षण सोडून देतात तर काही विद्यार्थी इतर जिल्ह्यात जातात. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून  विद्यार्थी पुढचे शिक्षण कसे घेतील आणि तेही आपल्याचं जिल्ह्यात यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 

गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून सांगितले तर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रोजगाराचे स्वरूप बदलत आहे, हे विद्यार्थ्यांना सांगावे लागेल. एका विशिष्ट जॉबच्या मागे न लागता आऊट ऑफ बॉक्स शोधावे लागेल.

हळूहळू त्याचा कल सामाजिक उद्योजकाकडे न्यायला पाहिजे त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. याचे मार्गदर्शन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच विकसित भारत २०४७ ही केंद्र शासनाची संकल्पना आहे. २०४७ मध्ये भारत जगात पाहिल्या क्रमांकाचा देश व्हावा, यासाठी सुद्धा या विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे नेपच्या माध्यमातून हे शक्य करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात माहिती दिली. प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी सांगितले की, नेप च्या अंमलबजावणी संदर्भात गोंडवाना विद्यापीठ इतर विद्यापीठाच्या पुढे आहे. दोन्ही जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना नेपच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश आहे. सर्वानीमिळून यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रिया गेडाम यांनी विद्यार्थी विकासच्या  माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.धनराज पाटील यांनी नॅक संदर्भात माहिती दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे  समन्वयक डॉ. विवेक जोशी यांनी केले. संचालन स. प्रा. विकास चित्ते यांनी तर आभार स. प्रा. केशव बैरागी यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos