माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळख असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  
जेटली यांना श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारनंतर त्यांची प्रकृती आणखीनच चिंताजनक झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. अँडिओक्रोनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्टचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
अरुण जेटली गेल्या दोन वर्षांपासून आजारी होते. जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती. त्यावर उपचार करण्यासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. त्याआधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी न्यूयॉर्कला जावं लागल्याने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. त्यांच्याऐवजी पियूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रीपदाबरोबरच संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. 
भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिलं होतं.   Print


News - World | Posted : 2019-08-24


Related Photos