पोलिस दलाच्या 'प्रयास' उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद


- दुर्गम व अतिदुर्गम भागातील २१ हजार ५४७ विद्यार्थ्यांचा सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात २३ ऑगस्ट रोजी प्रयास उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १०२ आश्रमशाळांमधील तब्बल २१ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत १० सामान्य ज्ञानाचे प्रश्न व्हाट्सॲपद्वारे आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. सदर शिक्षकांमार्फत प्रश्न दैनंदिन परीपाठाच्या माध्यमातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात येत होते. या सर्व प्रश्नांमधून ५० प्रश्नांची पत्रिका सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा परीक्षेत देण्यात आली होती.
या तिमाही परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास ३  हजार १०० रूपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास २  हजार १०० रूपये व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास १ हजार ५०० रूपये व प्रमाणपत्र त्यानंतर ४ पासून पुढील २२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रूपये व प्रमाणपत्र आणि प्रत्येक आश्रमशाळेतून प्रथम येणार्या विद्याथ्र्यास प्रोत्साहनपर 200 रूपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नक्षलप्रभावित अतिसंवेदनशिल जिल्ह्याचा लोकशाही व शांततेच्या मार्गाने विकास कसा करता येईल, याकरीता गडचिरोली जिल्हा पोलिस दलातर्फे विविध नाविण्यपूर्व उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचा बौध्दीक विकास होण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी याकरीता तसेच भविष्यात प्रशासकीय अधिकारी घडावेत याकरीता या उपक्रमाची पोलिस दलाने सुरूवात केली आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-23


Related Photos