राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन अदालतमध्ये सुमारे १ हजार ६०० प्रकरणांवर कार्यवाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी आज मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतमध्ये 1 हजार 591 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.
 केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या निर्देशानुसार आज संपूर्ण देशभरात एकाच दिवशी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले. लेखा व कोषागारे संचालनालय, अधिदान व लेखा कार्यालय आणि महालेखापाल कार्यालयाच्यावतीने येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले. या अदालतमध्ये मुंबई, पुणे, नाशिक व कोकण विभागातील प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली.
 राजेघाडगे यावेळी म्हणाले की, छोट्या-मोठ्या कारणांनी देशभरात अनेक निवृत्तीवेतन प्रकरणे प्रलंबित राहतात. मुंबई, नाशिक, कोकण आणि पुणे विभागातील मिळून एक वर्षापेक्षा आधीची 794 प्रकरणे तर एक वर्षाच्या आतील सुमारे 800 प्रकरणे प्रलंबित आहेत. सेवानिवृत्तांना वेळेत निवृत्तीवेतन सुरू करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या उद्देशाने पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांच्या त्रुटींबाबत चर्चा करणे, त्यावर मार्ग काढणे यामुळे शक्य होत आहे.

  वरिष्ठ लेखा अधिकारी श्रीमती बालिगा म्हणाल्या की, या पेन्शन अदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांतील त्रुटी जागेवरच काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. इतर अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने कार्यालयप्रमुखांना मार्गदर्शन करुन पुढील महिन्याभरात ही सर्व प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणे मंजूर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. याप्रसंगी सहायक अधिदान व लेखा अधिकारी सोमनाथ काकडे यांनी आभार मानले.
 मुंबई येथील पेन्शन अदालतसाठी महालेखापाल कार्यालयाचे 16 लेखा अधिकारी यांनी उपस्थित राहून प्रकरणनिहाय कार्यालयप्रमुख तथा आहरण अधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. अधिदान व लेखा कार्यालयाच्या 30 अधिकाऱ्यांनी समन्वयाचे काम केले.
 पेन्शन अदालतच्या उद्घाटन प्रसंगी वित्त विभागाचे उपसचिव इंद्रजीत गोरे, अधिदान व लेखा अधिकारी वैभव राजेघाडगे, लेखा व कोषागारे विभागाचे उपसंचालक एस. बी. भोर, महालेखापाल कार्यालयाच्या वरिष्ठ लेखा अधिकारी वीणा बालिगा आणि अन्य वरिष्ठ लेखा अधिकारी, चारही विभागातील आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित होते.
 
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-23


Related Photos