महत्वाच्या बातम्या

 वंचित आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पीएम जनमन अभियान : खा. रामदास तडस


- पीएम जनमन अभियानातील लाभार्थ्यांशी थेट संवाद

- कार्यक्रम लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण     

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पीएम जनमन अर्थात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान गेल्या १५ नोव्हेंबर पासून देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानातून आदिवासी कोलाम समाजाच्या लाभार्थ्यांना ११ मुलभूत सुविधाच्या योजना राबविण्यात येत आहे. योजनांचा आदिवासी कोलाम समाजांनी अभियानातून लाभ घेऊन इतर लाभार्थ्यांना लाभ घेण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले

आर्वी तालुक्यातील रोहणा येथे पीएम जनमन अभियानातील लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री यांच्या थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. दादाराव केचे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखडे, उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ, माजी सभापती निता गजाम, रोहना ग्रामपंचायतच्या सरपंच तृप्ती पावडे, शोभा काळे आदी उपस्थित होते.

जनमन अभियानांतर्गत केंद्र शासनाने आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांना पक्के घरे, आदिवासी वस्तीतील रस्त्यांची कामे, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, विद्युतीकरण, आदिवासी समाजाला व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, वनधन विकासाची स्थापना, अंगणवाडी केंद्र आदी सुविधा निर्माण करुन देण्यात येत आहे. यासाठी अर्थसंकल्पात २४ हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून आदिवासींचे जिवनमान उंचावण्यास मदत होईल, असे खा. रामदास तडस म्हणाले.

अभियानांतर्गंत जिल्ह्यात ४ लाख आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले असून या कार्डमुळे नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचेही ते पुढे बोलतांना म्हणाले. पीएमन जनमन अभियान आदिवासी समाजाला दिशा देणारे अभियान असून अभियानातून शेवटच्या घटकातील आदिवासींचा वैयक्तिक तसेच समाजाच्या वस्तींचा विकास होण्यास मदत होईल. योजनांच्या लाभाची रक्कम थेट खात्यात जमा होत असल्याने आ.दादाराव केचे म्हणाले.

आदिवासी समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेसोबतच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिष्यवृत्ती योजना, करीअर मार्गदर्शन प्रशिक्षण योजना आदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा, त्याचबरोबर जिल्ह्यात रेशीम शेतीला पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबर रेशीम शेती व्यवसाय करावा असे रविंद्र ठाकरे म्हणाले. 

या जनमन अभियानासाठी देशातील १८ राज्यातील २०० जिल्ह्यातील २२ हजार गावातील ७५ आदिम जमातीच्या विकासासाठी योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्याचा यात समावेश असून वर्धा जिल्ह्याचा यात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोठी गौरवाची बाब आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांचे सामुहिक वन हक्क दावे लवकरच निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. जिल्ह्यात स्ट्राँबेरीसाठी पोषक वातावरण असून शेतक-यांना स्ट्रॉबेरी शेतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ते पुढे बोलतांना म्हणाले.

तत्पुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनमन योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनतर जिल्ह्यातील जनमन योजनेंतर्गत सभागृह बांधकाम मंजूर प्रमाणपत्र, बिरसा मुंडा योजनेंतर्गत सिंचन विहिर मंजूरी प्रमाणपत्र, उमेद अंतर्गत आदिवासी गटांना कर्ज मंजूरी आदेशाचे मान्यवरांच्याहस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या योजनांचे स्टॉल लावून योजनाचा लाभ देण्यात आला. या स्टॉलला मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी केले तर संचलन प्रफुल वाघ यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येंन आदिवासी बांधव, नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos