मुकबधीर मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास, गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल


- दहा हजारांचा दंडही ठोठावला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आई - वडीलांचे निधन झाल्यामुळे बहिणीकडे राहत असलेल्या मुकबधीर मुलीवर ओळखीतल्याच इसमाने बलात्कार केला. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आरोपीस गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.सी. खटी यांनी दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे.
दिवाकर एकनाथ धुडसे (६४) रा. कनेरी ता. जि. गडचिरोली असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेतील पिडीत मुकबधीर मुलगी तिच्या बहिणीकडे राहत होती. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी पिडीत मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिने इशाऱ्याने आपल्या बहिणीस सांगितले. यामुळे तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डाॅक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. २० फेब्रुवारी २०१६ रोजी तिची सोनोग्राॅफी केली असता ती चार ते पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. पिडीतेच्या बहिणीने पिडीतेला इशाऱ्याने विचारपूस केली असता पिडीतेने आरोपीस इशाऱ्याने ओळखून सांगितले. तिच्या माहितीनुसार रूग्णालयाच्या आवारातच नवीन इमारतीच्या कामावर असलेल्या इसमाला दाखविण्यात आले. यावेळी तिने दिवाकर धुडसे याचा हात पकडून यानेच शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याचे इशाऱ्याने सांगितले. आरोपीने मुकबधीर असल्याची संधी साधून युवतीवर वारंवार अत्याचार केला होता. यामुळे ती चार ते पाच महिन्यांची गर्भवती राहिली होती. पिडीतेच्या बहिणीने गडचिरोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३७६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक एम.बी. गावडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. 
या प्रकरणात प्रमुख सत्र न्यायाधिश एस.सी. खटी यांनी साक्ष पुरावा तपासून आज २३ ऑगस्ट रोजी आरोपी दिवाकर एकनाथ धुडसे यास कलम ३७६ भादंवि अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजारांचा दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन यु. कुंभारे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम पाहिले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-23


Related Photos