माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयने चिदंबरम यांना साडे तीन वाजता राउज ॲव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोट्या कोर्ट रुममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मला वाटलं मोठ्या कोर्टात मला आणलं जाईल, अशी मिश्किल टिप्पणी चिदंबरम यांनी केली. त्यानंतर सुनावणीस सुरुवात झाली. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसाची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करायची असल्याचंही सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने चिदंबरम यांची २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली. 
यावेळी सीबीआयचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा केला. आयएनएक्स मीडियाने चुकीच्या पद्धतीने एफडीआय वसूली केली. एफआयपीबीच्या नियमांचं उल्लंघन करून ही वसूली करण्यात आली. त्यामुळे आएनएक्सला फायदा मिळाला. त्यामुळे या कंपनीने इतर कंपन्यांनाही पैसे दिले, असं मेहता यांनी सांगितलं. मौन पाळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जाणूनबुजून प्रश्नांची उत्तरं टाळणं हे चुकीचं आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण करण्यासाठीच चिदंबरम यांना कोठडी मिळणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. 
 सामान्यपणे सर्वसामान्य आरोपींनी राउज ॲव्हेन्यू कोर्टात कोर्टाच्या ३, ४, ५, आणि ६ नंबर गेटमधून आणलं जातं. पण सीबीआयने चिदंबरम यांना गेट नंबर दोनमधून आत आणलं. आधी सीबीआयने चिदंबरम यांना गेट नंबर एकमधून आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मीडियाने घेरल्याने सीबीआयने गाडी मागे वळवत दोन नंबर गेटमधून कोर्टात प्रवेश केला. 



  Print






News - World | Posted : 2019-08-22






Related Photos