महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका, संगीतरचनाकार, स्वरयोगिनी प्रभा अत्रे (९२) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडून प्रभा अत्रे यांना घराणेदार गायकीची तालीम मिळाली. त्यामध्ये आपल्या प्रतिभेचे रंग भरत त्यांनी गायकी समृद्ध केली.

तरुण वयात प्रभाताईंनी संगीतशारदा, संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. १९५५ पासून त्या गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. हिंदुस्थानात व विदेशांतील अनेक ख्यातनाम आणि महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रज्ञ संगीत, नाट्यसंगीत, भजन व भावसंगीत गायकीवर त्यांचे प्रभुत्व होते. हिंदुस्थानी शास्त्रज्ञ संगीताचा जगभर प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करीत असत. त्यांच्या मारू बिहाग रागातील जागू मैं सारी रैना, कलावती रागातील तन मन धन, किरवाणी रागातील नंद नंदन या त्यांच्या रचना आजही रसिकांवर अधिराज्य गाजवीत आहेत. त्यांची संगीतावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सरगम एक सशक्त संगीतसामग्री या विषयावरील त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंध हा या विषयावरचा एकमेव शोधग्रंथ आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

प्रभा अत्रे यांचा पुण्यात १३ सप्टेंबर १९३२ रोजी जन्म झाला. शास्त्रज्ञ आणि विधी विषयात त्यांनी पदवी घेतली. त्यांनी संगीतात डॉक्टरेट ही मिळविली. आकाशवाणीवर संगीत उपनिर्माती, तसेच मुंबईच्या एसएनडीटी महिला विश्वविद्यालयामध्ये पदव्युत्तर संगीत शिक्षण आणि संशोधन विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. संगीताशी संबंधित अनेक विषयांमध्ये त्यांचे योगदान होते. सतत नावीन्याचा शोध आणि सर्जनशील कलाविष्कारामुळे शास्त्रज्ञ, तसेच उपशास्त्रज्ञ गायनात त्यांचे वेगळेपण उठून दिसत असे. अत्रे यांनी संगीतासंबंधित ११ पुस्तके एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला होता.





  Print






News - Rajy




Related Photos