महत्वाच्या बातम्या

 देशातील युवक सिकलसेल ला समूळ नष्ट करू शकतात : डॉ. दीप्ती जैन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : सिकल सेल हा आजार दोन प्रकारचा असतो. एक वाहक तर दुसरा पीडित. पीडित व्यक्तीला रक्ताची कमी आणि पिलिया यासारखे आजार होतात. मात्र हा आजार सर्वात जास्त वाहक पसरवितात. वाहक दिसायला सर्व सामान्य दिसत असले तरी जोपर्यंत रक्त तपासणी करीत नाही तोपर्यंत त्यांना या आजाराचे निदान होत नाही. म्हणून प्रत्येक युवकाने रक्त तपासणी करून सिकल सेल बाबत जाणून घ्यावे असे आवाहन भारत सरकारच्या सिकल सेल टास्क फोर्सच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीप्ती जैन यांनी केले.

स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेद्वारे वरोरा तालुक्यात सिकलसेल या आनुवांशिक आजाराबाबत जनजागृती, तपासणी व उपाययोजनेचे काम हाती घेण्यात आले असून या निमित्ताने आनंदवनात आयोजित  व्याख्यान प्रसंगी त्या बोलत होत्या. 

यावेळी मंचावर आनंदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रकांत विरुटकर आणि आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे उपस्थित होते. 

सिकल सेल बाबत दृकश्राव्य माध्यमाद्वारे विवेचन करताना डॉ. जैन म्हणाल्या की, जर एका सिकलसेल वाहकाने दुसऱ्याशी लग्न केले तर होणारे अपत्य हे सिकल सेल पीडित असण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणेच्या वेळी महिलांनी सिकल सेल चाचणी करावी. 

आज शासकीय रुग्णालयामध्ये ही चाचणी विनामूल्य उपलब्ध असून हा संपूर्णपणे बरा होणारा आजार आहे असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांनी सिकलसेल आजाराबाबत नॅशनल हेल्थ मिशन व महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मदतीने स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेने सिकलसेल आजाराच्या शोधतपासणीच्या उद्देशाने महिन्याभरात तालुक्यातील १ ते ४० वयोगटातील जवळपास ६००० विद्यार्थ्यांची रक्त तपासणी केल्याचे कौतुक केले. 

स्फूर्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर जैन यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रशांत खुळे तर आभार राजीव दोडके यांनी मानले. वरोरा शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती याप्रसंगी होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos