आज राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार


वृत्तसंस्था /  मुंबई : कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणाचा तपास ईडीच्या अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. याच प्रकरणी चौकशीसाठी राज ठाकरे यांना ईडीतर्फे समन्स बजावण्यात आले असून, त्यानुसार आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता राज ठाकरे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. या कारवाईविरोधात बंद तसेच इतर पद्धतीने विरोध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र, राज ठाकरे यांनी शांतता बाळगण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे कोणत्याही आंदोलनाची घोषणा करण्यात आली नसली तरी छुप्या पद्धतीने तयारी करून ऐनवेळी विरोध प्रदर्शन केले जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. 
कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही बजावण्यात आले आहे. बुधवारी दुपारपासून पोलिसांनी मनसेच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
कोहिनूर सिटी एनएल कंपनीत उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. त्यामुळे राजबरोबर उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर हेही ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. बुधवारी जोशी यांची सलग तिसऱ्या दिवशी तर शिरोडकर यांची दुसऱ्या दिवशी सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने चौकशीसाठी बराच अवधी जात असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जोशी आणि शिरोडकर यांना पुन्हा सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-08-22


Related Photos