माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक


- उद्या कोर्टात हजर करणार 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर २८ तासांनंतर ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआय पथकाने तब्बल दीड तास चिदंबरम यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून उड्या मारून सीबीआय टीम आत गेली व ही कारवाई करण्यात आली. हा 'हायव्होल्टेज ड्रामा' सुरू असताना चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 
 चिदंबरम काँग्रेस मुख्यालयातून घरी गेल्याचे कळताच सीबीआयच्या पथकाने दिल्लीतील जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गेटवरून उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तब्बल दीड तास चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू संघवीही उपस्थित होते. चौकशी अंतिम टप्प्यात असताना सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी बोलावले आणि जमावाला पांगवून चिदंबरम यांना ताब्यात घेतलं. तत्पूर्वी चिदंबरम यांनी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले. 
आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतंही आरोपपत्रं दाखल करण्यात आलेलं नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवलं गेलं आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचं पालन करावं, असं चिदंबरम म्हणाले होते. हा खटला लढण्यासाठी वकिलांसोबत तयारी करत होतो. त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही, असं स्पष्ट करतानाच आपल्याला फरार म्हटलं जात असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 
स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशावेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अवघ्या सात मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम काँग्रेस कार्यालयातून निघून थेट त्यांच्या घरी गेले होते.   Print


News - World | Posted : 2019-08-21


Related Photos